पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचलेल्या इंग्लंड संघाने मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फलंदाजी केली. रावळपिंडी येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने ४ गडी गमावत ५०६ धावा केल्या. संघाच्या चार फलंदाजांनी शतके झळकावली. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून टी२० विश्वचषकाचा फिवर अजून उतरलेला नाही, असे वाटत होते. दरम्यान, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ओळख असणारा शोएब अख्तरने या सामन्याबद्दल आपले मत मांडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्याने इंग्लंडच्या फलंदाजांचे कौतुक केले.

रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नशीबात जे लिहिले ते प्रत्येक क्रिकेट जाणकार आणि क्रिकेटप्रेमीच्या अपेक्षेपलीकडचे होते. विशेषत: आजच्या युगात संघाच्या अशा नशिबी स्वतःच्या घरात इतकी दारूण अवस्था कोणी कल्पनाही करणे शक्य नाही. तरीही ते घडले. पाकिस्तानी संघाचे अननुभवी गोलंदाजी हे यामागे एक प्रमुख कारण होते, पण सर्वात मोठी समस्या होती ती पिंडी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी. त्यामुळेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने गोलंदाजांवर दया दाखवताना खराब खेळपट्टीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले.

इंग्लंडचे खेळाडू आजारी होते

इंग्लंडचा क्रिकेट संघ जेव्हा पाकिस्तानात पोहोचला तेव्हा तेथील अनेक खेळाडू आजारी पडल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता. या अहवालात १४ खेळाडूंना अज्ञात व्हायरसचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. मात्र, टी२० सारख्या कसोटीत इंग्लिश फलंदाज ज्या पद्धतीने खेळले, फलंदाजी केली, ते पाहता कोणाचीही प्रकृती बिघडल्याचे कुठेही दिसून आले नाही. याबाबत अख्तर यानेही भाष्य केले आहे.

अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसाठी त्याच्याच देशाच्या युवा वेगवान गोलंदाजांची त्याच्या घरच्या मैदानावर अशी अवस्था पाहणे नक्कीच वेदनादायी ठरले असेल. या परिस्थितीनंतर अख्तरने एक व्हिडिओ पोस्ट करून गोलंदाजांवर दया दाखवली आणि टी२० गोलंदाजांना कसोटी अनुभव घेण्यासाठी वेळ लागेल, असे सांगितले. अख्तर म्हणाला, “वेगवान गोलंदाजांविरुद्ध काहीही तक्रार नाही. ते सगळे टी२० चे वेगवान गोलंदाज आहे. कसोटी वेगवान गोलंदाज होण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे.  रावळपिंडीची खेळपट्टीदेखील त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करत नाहीत.

शोएबने खराब खेळपट्टी आणि संघाच्या वृत्तीला फटकारले. अनुभवी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “जर तुम्हाला ड्रॉसाठी खेळायचे असेल, तुम्हाला या सामन्यात टिकून राहायचे असेल, तर तुम्हाला ७०० धावा कराव्या लागतील. दोन डाव खेळावे लागतील. पाकिस्तान क्रिकेटला इथे खूप विचार करण्याची गरज आहे. हे चित्र पाहून खूप वाईट वाटते.

हेही वाचा :   PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम

इंग्लिश कसोटी संघात ब्रेंडन मॅक्क्युलम आणि बेन स्टोक्स यांची नवीन प्रशिक्षक, कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यापासून इंग्लंडने त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. असेच आणखी एक दृश्य रावळपिंडीत पाहायला मिळाले आणि शोएबने त्याचे कौतुक करत पाकिस्तानलाही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “त्यांचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना असे वाटत नाही की कसोटी क्रिकेट अधूनमधून खेळले जावे. एकदा फटके मारायला सुरुवात केली तेव्हापासून ते मारत राहा आणि ते फटकेबाजी देखील करत आहेत. त्याच्यासाठी पदार्पण करणारा लियाम लिव्हिंगस्टोनही सातव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेटलाही मानसिकता बदलण्याची गरज आहे.