पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील ऐतिहासिक कसोटी मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. १ डिसेंबरपासून दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. या ऐतिहासिक कसोटी सामन्यापूर्वी संघाच्या तयारीबद्दल बोलताना बाबर आझमने म्हटले आहे की, या मालिकेत आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू.
विशेष म्हणजे १७ वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी आला आहे. त्याच वेळी, नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. जिथे इंग्लिश संघाने विजय मिळवताना दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. त्यामुळे ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध सात सामन्यांची टी-२० मालिका खेळली, जी इंग्लिश संघाने ४-३ अशी जिंकली.
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी, इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने स्काय स्पोर्ट्ससाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची संघाच्या तयारी संदर्भात एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत बाबर आझमने एबी डिव्हिलियर्सबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
बाबर म्हणाला, ”होय आम्ही या मालिकेत पुढे जाण्यास उत्सुक आहोत. सर्वप्रथम मी इंग्लंड क्रिकेट संघाचे आपल्या देशात स्वागत करू इच्छितो आणि मला वाटते की टी-२० विश्वचषक स्पर्धेत बरेच खेळाडू आधीच खेळले आहेत. काही खेळाडू नवीन असले तरी मला वाटते की ते सर्व खेळाचा आनंद घेतील, परिस्थितीचा आनंद घेतील आणि विशेषत: पाकिस्तानच्या पाहुणचाराचा आनंद घेतील.”
मुलाखतीत आपला मुद्दा पुढे करताना बाबर आझम म्हणाला, ”खरे सांगायचे तर एबी डिव्हिलियर्स हा माझा आदर्श आहे. विशेषत: जेव्हा तो त्याचे शॉट्स खेळतो तेव्हा मला तो आवडतो. त्यामुळे जेव्हा मी त्याला टीव्हीवर फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा दुसऱ्या दिवशी नेट आणि ग्राउंडमध्ये नेमके तेच शॉट्स खेळण्यासाठी मी उत्सुक असतो. एबी डिव्हिलियर्सची कॉपी करण्याचा आणि त्याच्यासारखा खेळण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कारण तो माझा आदर्श आहे.”
सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना, झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप या तिघांनी शतकं झळकावली आहेत. त्यांच्या कामगिरी जोरावार इंग्लंड संघाने ७० षटकांत ४ बाद ४६४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना झाहीद महमूदने सर्वाधि २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मोहम्मद अली आणि हारिस रौफने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.