PAK vs ENG Test Match Updates Joe Root Century: जो रूटची बॅट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपताना दिसत आहे. जो रूट सध्या सर्वच सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. सध्या पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने पुन्हा एकदा धावांची टांकसाळ उघडली. जो रूटने ३५वे कसोटी शतक झळकावत बड्या बड्या फलंदाजांना मागे टाकले आहे. रूटने पाकिस्तानविरूद्ध मुलतान कसोटीत १६९ चेंडूत ७ चौकारांसह १०० धावा केल्या. या खेळीसह जो रूट इंग्लंडचा महान कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आपल्याच देशाच्या ॲलिस्टर कुकचे एक नव्हे तर दोन विक्रम मोडले आहेत.

जो रूट ठरला इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

जो रूट आता इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. आता जो रूट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ॲलिस्टर कुकने कसोटी क्रिकेटमध्ये १६१ सामने आणि २९१ डाव खेळले आणि आपल्या संघासाठी १२४७२ धावा केल्या. या कालावधीत त्याची सरासरी ४५.३५ राहिली असून तो ४६.९५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना आपण पाहिले आहे. ॲलिस्टर कुकने आपल्या कारकिर्दीत ३३ शतके आणि ५७ अर्धशतके झळकावली आहेत. २०१८ मध्येच ॲलिस्टर कुकने निवृत्तीची घोषणा केली होती.

हेही वाचा –PAK vs ENG : पाकिस्तानच्या खेळाडूमध्ये संचारला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारत एका हाताने टिपला उत्कृष्ट झेल, पाहा VIDEO

जो रूटने आतापर्यंत १४७ कसोटी सामन्यांच्या २६८ डावांमध्ये १२४७३ हून अधिक धावा केल्या आहेत. या आकडेवारीत सातत्याने भर पडत आहे. जो रूटने ५०.८४ च्या सरासरीने आणि ५६.९५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी ३४ शतके आणि ६५ अर्धशतके केली आहेत. जो रूट प्रत्येक बाबतीत ॲलिस्टर कुकच्या पुढे आहे.

हेही वाचा – NZ W vs AUS W : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला खडतर

जो रूटचा आणखी एक पराक्रम

जो रुट हा केवळ कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला नाही, तर सर्वाधिक कसोटी धावांच्या बाबतीतही तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो राहुल द्रविडच्या जवळ पोहोला आहे. द्रविडच्या नावे १३, २८८ धावा आहेत. दोघांमध्ये आता ८२४ धावांचे अंतर बाकी आहे. सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रुट हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs BAN : दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल, दिल्लीत ‘लोकल बॉय’ करणार पदार्पण?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर (भारत) – १५,९२१
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १३,३७८
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – १३, २८९
राहुल द्रविड (भारत) – १३,२८८
जो रूट (इंग्लंड) – १२,४७३

पाकिस्तानविरूद्ध खास विक्रम

जर आपण पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यांबद्दल बोललो तर या दोन संघांमध्ये जेव्हाही सामना झाला आहे, तेव्हा ॲलिस्टर कुकने सर्वाधिक १६ वेळा ५० हून अधिक धावांचा आकडा गाठला आहे. तर जो रूटने आतापर्यंत १७ वेळा हा पराक्रम केला आहे. म्हणजेच इथेही रूट ॲलिस्टर कुकच्या पुढे गेला आहे.