पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे. बाबरने शानदार फलंदाजी करताना आपले शतक पूर्ण केले आहे. बाबरने १५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ज्यामध्ये १० चौकार आणि १ षटकार लगावला. या बरोबर त्याने बरेच विक्रम केले आहेत.
बाबर आझम फलंदाजीसाठी आला तेव्हा पाकिस्तानी संघाने १९ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. काही वेळाने इमाम-उल-हक (२४) देखील परतला आला, ज्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या ४३/३ झाली. अशा परिस्थितीत बाबरने सौद शकील (२२) सोबत ६२ धावा जोडून पाकिस्तानी संघाला अडचणीतून सावरले. शकील बाद झाल्यानंतर, आझमने सर्फराज अहमदसोबत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
पाँटिंगचा मोडला विक्रम –
या शतकी खेळीसह बाबर आझम एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. बाबरचा यंदाची ही २५वी ५०+ धावसंख्या होती. २००५ मध्ये, रिकी पॉन्टिंगने पन्नास किंवा त्याहून अधिक २४वेळा धावा केल्या होत्या. यंदाच्या कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली असली, तरी बाबर आझमचा सुवर्ण फॉर्म अबाधित राहिला आहे.
युसूफचा देखील मोडला विक्रम –
बाबर आझमने २०२२ मध्ये आतापर्यंत ४४ सामन्यांमध्ये ५२.६७ च्या सरासरीने २४२३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७ शतके आणि १७ अर्धशतक झळकवली आहेत. बाबरने आज १३ धावा करताच मोहम्मद युसूफचा विक्रम मोडला आहे. मोहम्मद युसूफने २००६ मध्ये ३३ सामन्यांत ६९.५७च्या सरासरीने २४३५ धावा केल्या होत्या. युसूफने या काळात ९ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली होती.
जो रूट आणि इंझमाम यांनाही टाकले मागे –
हेही वाचा – IPL 2023: आकाश चोप्राने पंजाब किंग्जच्या ‘या’ रणनीतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
एवढेच नाही तर बाबर आझम या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला (१०९८) मागे टाकले आहे. बाबरने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अकराव्यांदा पन्नास किंवा त्याहून अधिकचा आकडा गाठला आहे. यासह बाबर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ५०+ कसोटीत धावा करणारा पाकिस्तानी कर्णधार बनला आहे. बाबरने १९९५, २००० आणि २००५ या कॅलेंडर वर्षांमध्ये, १० वेळा कसोटी क्रिकेटमध्ये ५०+ धावा करणाऱ्या इंझमाम-उल-हकला मागे टाकले आहे.