न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिली कसोटी कराची येथे सुरु आहे. या सामन्यात केन विल्यमसनने शानदार द्विशतक झळकावले. या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम असे काही बोलत असल्याचे दिसले की जे ऐकून समालोचकांनाही हसू आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
खरे तर ही घटना केन विल्यमसन १९४ धावांवर खेळत असतानाची आहे. विल्यमसन आपल्या द्विशतकापासून केवळ ६ धावा दूर होता. पण त्यावेळी पाकिस्तानी संघाला विल्यमसनला कोणत्याही किंमतीत बाद करायचे होते. परंतु त्यांच्याकडचे रिव्ह्यू संपले होते. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पंजाबीमध्ये म्हणाला, “आम्हाला पुढच्या डावाचा रिव्ह्यू आताच द्या.” त्याचे हे शब्द स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले. दुसरीकडे बाबरने असे म्हणताच समालोचकांनाही हसू आवरता आले नाही. ज्यामुळे ते सुद्धा समालोचन करताना हसायला लागले.
बाबरच्या या वक्तव्यावर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करताना आणि विविध कमेंट करताना दिसत आहेत. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नॅशनल स्टेडियम कराची येथे खेळला जात आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ६१२ धावा करून डाव घोषित केला. आता दुसऱ्या डावात पाकिस्तान संघाने ८ गडी गमावून ३११ धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्याकडे आता १३७ धावांची आघाडी आहे.
न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावात देखील शानदार गोलंदाजीचा मारा सुरुच ठेवला आहे. न्यूझीलंडकडून इश सोधीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३७ षटकांत ८६ धावा दिल्या. त्याचबरोबर मायकेल ब्रेसवेलने देखील २ विकेट्स घेतल्या.