पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सोमवार पासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद रिझवानला वगळले आहे. मोहम्मद रिझवानची गणना पाकिस्तानच्या मोठ्या खेळाडूंमध्ये केली जाते. मात्र, कसोटीत त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्याच्या जागी माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सर्फराज अहमदचा समावेश करण्यात आला आहे.
शनिवारी माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदीला पीसीबीने हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त केले होते. त्याचा पहिला झटका मोहम्मद रिझवानला बसला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज सर्फराज अहमदला संधी देण्यात आली आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आज कराचीमध्ये सुरुवात झाली आहे.
३० वर्षीय मोहम्मद रिझवानचा टी-२० क्रिकेट मध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण त्याला कसोटीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अलीकडेच इंग्लंडकडून मायदेशात झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा ०-३ असा दारूण पराभव झाला. रिझवानने या मालिकेत २९, ४६, १०, ३०, १९ आणि ७ धावा केल्या होत्या. म्हणजेच ६ डावांपैकी एकाही डावात त्याला अर्धशतक झळकावता आले नाही.
मोहम्मद रिझवानच्या कसोटी कामगिरीबद्दल बोलायचेतर, त्याने आतापर्यंत २७ कसोटीत ३८ च्या सरासरीने १३७३ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि ७ अर्धशतके केली आहेत. यामध्ये नाबाद ११५ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
४ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन –
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बदल झाल्यानंतर सरफराज अहमदला तब्बल ४ वर्षांनी कसोटी खेळण्याची संधी मिळाली. जानेवारी २०१९ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळला होता. सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बाबर आझमने शाहिद आफ्रिदीशी बोलल्यानंतरच प्लेइंग-११ बनवणार असल्याचे सांगितले होते. ३५ वर्षीय सरफराजने आतापर्यंत ४९ कसोटीत ३६च्या सरासरीने २६५७ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत. ११२ धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे.