Pakistan vs New Zealand 3rd T20I Score: हसन नवाझच्या ४५ चेंडूत नाबाद १०५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दोन सामने जिंकत तीन सामन्यांची मालिका आधीच जिंकली होती. तिसऱ्या लढतीत पाकिस्तानने शानदार खेळ करत बाजी मारली. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी घरच्या मैदानावर न्यूझीलंडबरोबर झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पराभव सहन करावा लागला होता. सध्या हलाखीच्या परिस्थितीतून जाणाऱ्या पाकिस्तान संघाला चालू वर्षात हा तिसरा सामना जिंकण्यात यश मिळवले आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने मार्क चॅपमनच्या ९४ खेळीच्या जोरावर २०४ धावांची मजल मारली. चॅपमनने ४४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ही खेळी सजवली. कर्णधार मायकेल ब्रेसवेलने १८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे हारिस रौफने ३ तर शाहीन शहा आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी आणि अबरार अहमदने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद हॅरिस आणि हसन नवाझ यांनी ७४ धावांची दमदार सलामी दिली. २० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली. कर्णधार सलमान अघाने हसन नवाझला चांगली साथ देत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑकलंडच्या छोट्या मैदानाचा फायदा उठवत नवाझने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूर समाचार घेतला. इश सोधीच्या २ षटकात २८ धावा कुटण्यात आल्या. बेन सीअर्सच्या ४ षटकात ५१ धावा चोपण्यात आल्या. तिसरा टी२० सामना खेळणाऱ्या २२वर्षीय नवाझने थेट शतकाला गवसणी घातली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यजमान पाकिस्तानवर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूंची कामगिरीही यथातथाच झाली. पाकिस्तानने कोट्यवधी रुपये खर्चून मैदानांचं नूतनीकरण केलं होतं. मात्र पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आली नाही. माजी खेळाडूंनी संघावर जोरदार टीका केली. न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. दुसरीकडे प्रमुख खेळाडू आयपीएलकरता रवाना झाल्याने न्यूझीलंडनेही दुय्यम संघ निवडला. पहिल्या दोन लढतीत पराभव पदरी पडलेल्या पाकिस्तानने तिसऱ्या लढतीत चांगलं पुनरागमन केलं.
टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी शतक झळकावणारा नवाझ केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी बाबर आझम, अहमद शेहझाद, मोहम्मद रिझवान यांनाच शतक झळकावता आलं होतं. तरुण तडफदार नवाझने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत खणखणीत शतकी खेळी साकारली. न्यूझीलंडमध्ये टी२० प्रकारात शतक झळकावणारा नवाझ दहावा खेळाडू ठरला.