पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कराची नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार बाबर आझमने या सामन्यात मोठी इतिहास रचला आहे. किवी संघाविरुद्धच्या सामन्यात बाबरने १३ धावा करताच, तो एका वर्षात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
बाबर आझमने २०२२ मध्ये आतापर्यंत ४४ सामन्यांमध्ये ५२.६७ च्या सरासरीने २४२३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७ शतके आणि १७ अर्धशतक झळकवली आहेत. बाबरने आज १३ धावा करताच मोहम्मद युसूफचा विक्रम मोडला आहे. मोहम्मद युसूफने २००६ मध्ये ३३ सामन्यांत ६९.५७च्या सरासरीने २४३५ धावा केल्या होत्या. युसूफने या काळात ९ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली होती.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचे झाले, तर हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर आहे. डावखुऱ्या फलंदाजाने २०१४ मध्ये २८६८ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. २०१७ मध्ये किंग कोहलीच्या बॅटमधून २८१८ धावा निघाल्या होत्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २७ षटकांत ३बाद धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बाबर आझम ४७ आणि सौद शकिलने १४ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना मायकेल ब्रेसवेलने दोन आणि अझाज पटेलने १ विकेट घेतली.