न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. पदार्पणवीर विल सॉमरविलेने न्यूझीलंडच्या मालिका विजयाचा सुवर्णाध्याय लिहिला. तिसरी आणि अखेरची कसोटी न्यूझीलंडने शुक्रवारी १२३ धावांनी जिंकून पाकिस्तानवर ४९ वर्षांनंतर प्रथमच परदेशात मालिका विजय संपादन केला.
या सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याला ज्यावेळी विजेत्या संघाला देण्यात येणारी ट्रॉफी घेण्यासाठी बोलावण्यात आले, तेव्हा आपले मत व्यक्त केल्यांनतर तो चक्क टेबलावर ठेवलेली ट्रॉफी स्वतःच्या हाताने उचलून घेऊन गेला. प्रायोजकत्व असलेल्या कंपनीचे पदाधिकारी त्याला ती ट्रॉफी प्रदान करणार होते, मात्र त्याआधीच त्याने ती ट्रॉफी उचलली आणि तो संघाबरोबर फोटो काढण्यासाठी निघून गेला. इतकेच नव्हे तर संघातील सहकाऱ्याला मिळालेला बक्षिसाचा चेक त्याने बाजूला फेकून दिला आणि संघाबरोबर ट्रॉफीबरोबर विजयी पोझ देण्यासाठी उभा राहिला.
Just caught up with the excellent end of #PAKvNZ. This is one of the funniest trophy presentations I have ever seen. @SteelyDan66 gives the perfect commentary at the end. pic.twitter.com/NEV1PXZRk5
— Danny Morrison Towers (@chadddtowers) December 8, 2018
दरम्यान, ऑफ-स्पिनर सॉमरविलेने ५२ धावांत ३ बळी घेतले. त्याला फिरकी गोलंदाज अजाझ पटेलने ४२ धावांत ३ बळी घेत छान साथ दिली. त्यामुळे न्यूझीलंडचे ८० षटकांत २८० धावांचे लक्ष्य पाकिस्तानला पेलता आले नाही. ५६.१ षटकांत त्यांचा दुसरा डाव १५६ धावांत आटोपला.
कर्णधार केन विल्यम्सनच्या १३९ धावांच्या खेळीच्या बळावर सामन्याचा आणि मालिकेच्या निकालाला कलाटणी मिळाली. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर पाकिस्तानच्या यासीर शाहला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. न्यूझीलंडने याआधी १९६९मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या देशात १-० असा कसोटी मालिकेत विजय मिळवला होता.