PAK vs SA 1st Test Updates in Marathi: दक्षिण आफ्रिका – पाकिस्तान बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जात आहे. सध्याच्या घडीला तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळवले जात आहेत, भारत-ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे-अफगाणिस्तान. या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी पदार्पण केले आहे आणि या खेळाडूंनी पदार्पणाच्या सामन्यातच चांगली कामगिरी केली आहे. पण दक्षिण आफ्रिकेचया खेळाडूने मोठा विक्रम केला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवार २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु पहिल्या विकेटसाठी संघाला खूप प्रतिक्षा करावी लागली. अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मार्को यान्सन यांनी सातत्यपूर्ण गोलंदाजी केली पण तरीही त्यांना यश मिळाले नाही. सलामीवीर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि युवा फलंदाज सैम अयुब यांनी दमदार सुरुवात केली.
दक्षिण आफ्रिकेला पहिल्या तासात कोणतेही यश मिळाले नाही. गोलंदाजीत बदल करत डॅन पॅटरसनला मैदानात उतरवले पण त्यालाही विकेट मिळवण्यात यश आले नाही. त्यानंतर १५व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने झंझावाती वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशला आक्रमणात आणले आणि ही चाल कामी आली. या सामन्यात कसोटी पदार्पण करणाऱ्या बॉशने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी कर्णधार मसूदची विकेट घेत संघाला मोठे यश आणि दिलासा दिला.
हेही वाचा – Virat Kohli Fined: विराट कोहलीवर ICC ने केली कारवाई, सॅम कोन्स्टासबरोबर वाद घालणं पडलं भारी
कॉर्बिन बॉश पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी बर्ट वोगलर (१९०६), डॅन पीट (२०१४), हार्डस विल्हौन (२०१६) आणि त्शेपो मोरेकी (२०२४) यांनी कसोटी पदार्पणात ही कामगिरी केली होती. पण बॉशने केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे जे इतर चार गोलंदाजांपेक्षा वेगळे आहे. १८८९ पासून कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या १३५ वर्षांच्या इतिहासातील बॉश हा पहिला गोलंदाज आहे, ज्याने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. यानंतर बॉशने सौद शकीलची विकेटही घेतली.