काल म्हणजेच ११ सप्टेंबरला झालेल्या आशिया कप २०२२ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने सहाव्यांदा या चषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा सामना अतिशय रोमांचक आणि अटीतटीचा ठरला. पहिल्या १० षटकांमध्ये सामना श्रीलंकेच्या ताब्यातून निसटला असे वाटत होते. याचे कारणही तसेच होते. श्रीलंकेचे आघाडीचे पाच फलंदाज केवळ ५८ धावा करून माघारी परतले. हा संघ पाकिस्तानी गोलंदाजीसमोर अतिशय कमकुवत भासत होता.
मात्र, पाकिस्तानच्या शादाब खानने सोडलेल्या दोन कॅच श्रीलंकेसाठी अतिशय फायदेशीर ठरल्या. शादाबने एकदा नाही तर चक्क दोनवेळा भानुका राजपक्षेला जीवनदान दिले. यामुळेच पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ झाली. जवळपास निम्मा संघ केवळ ५८ धाव करून माघारी परतल्यानंतर भानुका राजपक्षे आणि अष्टपैलू वनिंदू हसरंगा यांच्याकडून संघाला अपेक्षा होता. या दोघांनीही आपल्या संघाच्या अपेक्षा पूर्ण करत संघाला चांगली धावसंख्या करून दिली. यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंनी दोनवेळा जीवनदान दिल्याचा भानुका राजपक्षेने चांगलाच फायदा उचलला. त्याने ४५ चेंडूंमध्ये ७१ धावा केल्या. यामध्ये सहा षटकार आणि ३ चौके होते. त्याच्याच मदतीने श्रीलंका २० षटकांमध्ये १७० धावा करू शकली.
१९व्या षटकात भानुका राजपक्षेने मोठा शॉट मारला. ही कॅच घेण्यासाठी आसिफ आणि शादाब एकत्र धावले. आसिफच्या हातात कॅच होती मात्र शादाबत्याला धडकल्यामुळे त्याच्या हातातून कॅच निसटली आणि बाऊंड्रीच्या बाहेर गेली.
पाकिस्तान तिसऱ्यांदा या चषक आपले नाव करण्याच्या प्रयत्नात असतानाच शादाबने सोडलेल्या दोन कॅच संघासाठी खूपच नुकसानदायक ठरल्या. पाकिस्तानच्या या पराभवानंतर चाहते शादाब खानवर चांगलेच संतापले असून पाकिस्तानमध्ये त्याच्यावर टीका होत आहे.
सामन्यानंतर शादाब खानने आपल्या चुकीबद्दल पाकिस्तानची माफी मागितली. सामना संपल्यानंतर काही वेळातच त्याने जाहीरपणे आपली चूक मान्य केली आणि चाहत्यांची माफी मागितली. शादाब खानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘कॅचनेच मॅच जिंकल्या जातात. या पराभवाची जबाबदारी मी घेतो. मी माझ्या संघाला निराशा केले. ही स्पर्धा सकारात्मक होती. नसीम, हरिस, नवाज यांच्या रूपाने आमची संपूर्ण गोलंदाजी शानदार होती. मोहम्मद रिझवानने कडवी झुंज दिली. संपूर्ण टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले. विजयाबद्दल श्रीलंकेचे अभिनंदन.’