Sri Lanka vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत गुरुवारी (१४ सप्टेंबर) पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने येणार आहेत. दोघांमधील हा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंकेसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ याआधीच विजेतेपदाच्या लढतीसाठी अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे बांगलादेशचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जर पावसाने खोडा घातला तर कसे असेल समीकरण, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपर-४ मधील गुणतालिकेतील स्थान

सुपर-४च्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे. त्याचे दोन सामन्यात चार गुण आहेत. भारताचा निव्वळ रन रेट +२.६९० आहे. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे दोन सामन्यांत दोन गुण आहेत. श्रीलंकेचा निव्वळ रनरेट -०.२०० आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर असून त्यांचेही दोन सामन्यांत दोन गुण आहेत. नेट रन रेटमध्ये ते श्रीलंकेपेक्षा खूप मागे आहेत. पाकिस्तानचा निव्वळ रन रेट -१.८९२ आहे. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्याचे दोन सामन्यांत शून्य गुण आहेत. त्याने दोन्ही सामने गमावले असून ते अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. बांगलादेशचा निव्वळ रन रेट -०.७४९ आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांची समीकरणे काय आहेत?

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना म्हणजे एक प्रकारे आशिया चषकाची उपांत्य फेरी आहे. या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये एकही उपांत्य फेरीचा सामना नाही, पण फायनलचा विचार केल्यास हा सामना एक प्रकारे उपांत्य फेरीसारखाच आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. पाकिस्तानसाठी हा सामना संपूर्ण ५० षटकांचा होणे महत्त्वाचे आहे. यामागील कारण, जर हा सामना रद्द झाला तर श्रीलंका आपोआप नेट रनरेटच्या आधारे अंतिम फेरीत दाखल होईल.

हेही वाचा: SL vs PAK, Asia Cup: ‘करो या मरो’ सामन्यात पाकिस्तानने निम्मा संघ बदलला, प्लेईंग ११मध्ये कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या

या सामन्यासाठी काही राखीव दिवस आहे का?

नाही, श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. आशिया चषक स्पर्धेत केवळ अंतिम आणि भारत-पाकिस्तान सुपर-४ सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. राखीव दिवशीच भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात कोणाचे आहे पारडे जड?

एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण विक्रमांमध्ये पाकिस्तान संघ श्रीलंकेवर आघाडीवर असल्याचे दिसते. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १५५ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने ९२ सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने ५८ सामने जिंकले आहेत. ४ सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला.

हेही वाचा: Rohit Sharma: “मी जोपर्यंत कर्णधार आहे तू संघाबाहेर…” कुलदीप यादवबद्दल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितचे सूचक विधान

एकूण एकदिवसीय क्रिकेटमध्ये जरी पाकिस्तानने श्रीलंकेवर वरचष्मा मिळवला असला तरी आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका पाकिस्तानवर वरचढ ठेवली आहे. एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात १७ सामने झाले आहेत, ज्यामध्ये श्रीलंका संघ पुढे असून त्यांनी १२ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने ५ सामने जिंकले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs sl if pakistan vs sri lanka match is washed out due to rain then who will play the final from india avw