दहशतवादाच्या सावटाखाली श्रीलंका क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱ्याचा निर्धार केला. त्यानुसार मंगळवारी श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला पोहोचला आणि आज तब्बल १० वर्षानंतर पाकिस्तानात पहिल्यांदाच एक गोष्ट घडणार आहे. पाकिस्तानात तब्बल १० वर्षानंतर श्रीलंकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. २००९ साली श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात गेला नव्हता. पण आज श्रीलंकेचा संघ प्रथमच पाकिस्तानात खेळणार आहे.

श्रीलंकेचा संघ पाकिस्तानातील कराची येथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि लाहोर येथे तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानात कोणताही धोका नाही. या प्रकरणाची खात्री संरक्षण मंत्रालयाने दिली आहे, अशी माहिती श्रीलंका क्रिकेट संघटनेचे सचिव मोहन डिसिल्व्हा यांनी दिली. त्यानंतर श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा निश्चित करण्यात आला आणि त्यांना पाकिस्तानसाठी रवाना होण्यास परवानगी देण्यात आली.

दरम्यान, श्रीलंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंकेचा पाकिस्तान दौऱ्यावर नियोजित असल्याची घोषणा झाल्यावर काही खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.

पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. यामध्ये श्रीलंकेचा एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने, टी २० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश होता. त्यानंतर काही दिवस दौऱ्याचे भवितव्य अधांतरी होते. श्रीलंकेच्या खेळाडूंनी घेतलेल्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण अखेर काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट संघटनेने या दौऱ्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

Story img Loader