PAK vs SL, Asia Cup 2023 Super 4 Update: बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचवेळी दासून शनाकाच्या श्रीलंका संघाला हे लक्ष्य ४२ षटकांत गाठावे लागणार आहे. पावसामुळे हा सामना ४५-४५ षटकांचा करण्यात आला होता. मात्र यानंतर पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे पुन्हा हा सामना ४२ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानने ४२ षटकांत ७ विकेट्स गमावत २५२ धावा केल्या. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अगोदरच अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, आता अंतिम फेरीत भारताला कोणता संघ आव्हान देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.
मोहम्मद रिझवानने खेळली नाबाद ८६ धावांची खेळी –
फखर जमान झटपट पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर मात्र, पाकिस्तान-श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान ११ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. मात्र, अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी झाली. मात्र त्यानंतरही पाकिस्तानी फलंदाज सातत्याने बाद होत राहिले. पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने सर्वाधिक धावा केल्या. मोहम्मद रिझवानने ७३ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले.
अहमदने रिझवानसोबत शतकी भागीदारी करत सामन्यात पाकिस्तानचे दमदार पुनरागमन केले –
अब्दुल्ला शफीकने ६९ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले. तर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने ३५ चेंडूत २९ धावा केल्या. बाबर आझमने आपल्या खेळीत ३ चौकार मारले. इफ्तिकार अहमदने ४० चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले. त्याने रिझवानसोबत शतकी भागीदारी करत सामन्यात पाकिस्तानचे दमदार पुनरागमन केले. मोहम्मद हरिस आणि मोहम्मद नवाज अनुक्रमे ३ आणि १२ धावा करून बाद झाले.
हेही वाचा – IND vs PAK: भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदी जावई शाहीन शाहवर संतापला; म्हणाला, ‘जर नसीमप्रमाणे…’
श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर प्रमोद मधुसूदनने 1 बळी आपल्या नावावर केला. याशिवाय महिष तिक्षाना आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.