PAK vs NZ 1st T20I Highlights: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बाबर-रिझवानला वगळत पाकिस्तानचा टी-२० साठी नवा संघ तयार केला आहे. हा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यार असून पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या नव्या संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. या दौऱ्याची सुरुवात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेने झाली आहे. पाकिस्तानचा नवा संघ १०० धावाही करू शकला नाही आणि न्यूझीलंडच्या संघाने १० षटकांतच सामना जिंकला.

पाकिस्तानच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सलमान अली आगाकडे देण्यात आले आहे. पण त्याच्या नेतृत्त्वात पाकिस्तानची अवस्था अधिक बिकट झाली आहे आणि संघाला पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. फलंदाजांची अवस्था इतकी वाईट होती की संपूर्ण संघाला १०० धावाही करता आल्या नाहीत.

न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पाकिस्तान संघ पहिल्याच षटकापासून बॅकफूटवर असल्याचे दिसून आले. त्यांचा सलामीवीर मोहम्मद हरीस पहिल्याच षटकात खाते न उघडताच बाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर हसन नवाजही खाते न उघडता माघारी परतला. पाकिस्तानने खातेही न उघडता आपले दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. त्यानंतर इरफान खानच्या रूपाने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. त्यालाही केवळ १ धाव करता आली. पाकिस्तानची सुरुवात इतकी खराब झाली होती की, पहिल्या ३ षटकांत त्यांना केवळ ३ धावा करता आल्या.

पाकिस्तानने ११ धावांमध्ये शादाब खानच्या रूपात चौथी विकेट गमावली. यानंतर सलमान आगा आणि खुशदिल शाह यांच्यात छोटीशी भागीदारी पाहायला मिळाली. पण ही जोडीही फार काही करू शकली नाही आणि कर्णधार सलमान आगा १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरीकडे, खुशदिल शाहने ३२ धावा केल्या, जो या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्याशिवाय जहांदाद खानने १७ धावा केल्या, तरीही पाकिस्तानचा संघ १८.४ षटकांत ९१ धावा करून सर्वबाद झाला.

या डावात २२ धावांमध्ये पाकिस्तानने ८ विकेट गमावल्या. पाकिस्तानच्या सुरुवातीच्या ४ विकेट केवळ ११ धावांवर पडल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या ४ विकेट्स केवळ ११ धावा करू शकल्या. आश्चर्यकारक बाब म्हणजे या डावात न्यूझीलंडने ३ झेलही सोडले, तरीही पाकिस्तान १०० धावांच्या आत गारद झाला. या डावात जेकब डफी आणि काइल जेमिसन हे न्यूझीलंडचे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. जेकब डफीने ३.४ षटकात १४ धावा देत ४ फलंदाजांच्या बाद केले. काईल जेमिसनने ४ षटकात केवळ ८ धावा दिल्या आणि ३ विकेट घेतले. इश सोधीनेही २ विकेट्स घेण्यात यश मिळवले आणि जॅचरी फॉल्केसला १ विकेट मिळाली.

न्यूझीलंडसमोर हा सामना जिंकण्यासाठी ९२ धावांचे लक्ष्य होते. किवी फलंदाजांनीअवघ्या १० षटकांत हा विजय मिळवला. त्यांनी केवळ १०.१ षटकांत म्हणजे ६१ चेंडूत लक्ष्याचा पाठलाग केला. या डावात न्यूझीलंडकडून टीम सेफर्टने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २९ चेंडूत १५१.७२ च्या स्ट्राईक रेटने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. तर, फिन ऍलनने १७ चेंडूंत २९ धावा करून नाबाद राहिला. टीम रॉबिन्सननेही १५ चेंडूत १८ धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी पाकिस्तानी संघ केवळ १ विकेट मिळवू शकला, ही विकेट अबरार अहमदच्या नावावर आहे.

Story img Loader