PAK vs BAN Match abandoned without toss: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा ९वा सामना न खेळताच रद्द करण्यात आला आहे. या सामन्याची नाणेफेकदेखील होऊ शकली नाही. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यासह यजमान पाकिस्तान संघाची मोहिम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाशिवाय संपली आहे. पाकिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

अ गटातील पाकिस्तानच्या संघाने सुरूवातीचे दोन सामने गमावल्याने त्यांना उपांत्य फेरी गाठणं अवघड झालं. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. या गटातून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पाकिस्तानसोबतच बांगलादेशचा संघही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तान-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द

पावसामुळे पाकिस्तान-बांगलादेश सामन्याच्या नाणेफेकीला उशीर झाला. रावळपिंडीत ओल्या आऊटफिल्डमुळे सामना सुरू होऊ शकला नाही. सामन्यापूर्वी कोसळणारा पाऊस नुकताच थांबला होता. मात्र ओल्या मैदानामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. पाकिस्तानी संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, भारतीय संघाने त्यांना ६ विकेट्सने पराभूत केले आणि आता त्यांचा बांगलादेशविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणारा आणि स्पर्धेत एकही सामना जिंकू न शकलेला पाकिस्तानी संघ केनियानंतरचा दुसरा संघ ठरला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २००० मध्ये जेव्हा केनिया हा यजमान संघ होता तेव्हा तो फक्त एकच सामना खेळला आणि पराभूत झाला होता.

यासह यजमान पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील अ गटात शेवटच्या स्थानी राहिला आहे. पाकिस्तानच्या खात्यात एक गुण आहे तर संघाचा नेट रन रेट -१.०८७ आहे. तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानी असून त्यांच्या खात्यातही एक गुण आहे. पण त्यांचा रन रेट -०.४४३ आहे. जो पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. तर न्यूझीलंड आणि भारत अनुक्रमे चार गुणांसह पहिल्या-दुसऱ्या स्थानी आहे. तर अ गटातील अखेरचा सामना भारत-न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Story img Loader