चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमान असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाची या स्पर्धेत अतिशय खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघ एकही सामना न जिंकता बाहेर पडला. तेव्हापासून पाकिस्तानच्या खेळाडूंना माजी क्रिकेटपटू आणि जगभरातील दिग्गजांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यानच पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघाचा भाग असलेल्या सौद शकीलने अजून एक अशी कामगिरी केली आहे, की पाकिस्तान संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या सौद शकीलच्या एका कृतीमुळे तो स्वत: आणि पाकिस्तान क्रिकेटला ट्रोल केले जात आहे. सौद शकील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग होता. पण सौद शकील आता फलंदाजीला जायचं असतानाही झोपल्याने त्याला टाईम आऊट देण्यात आले, ज्याचा त्याच्या संघाला मोठा फटका बसला.
सौद शकीलला प्रेसिडेंट कपमधील एका सामन्यात क्रिझवर जाण्यापूर्वी झोप लागल्याने टाइम-आउट देण्यात आले. शकील प्रेसिडेंट कप ग्रेड 1 प्रथम श्रेणी स्पर्धेत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानसाठी पाकिस्तान टेलिव्हिजन विरुद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार होता. पण झोपेमुळे तो नियोजित वेळेत क्रीजवर पोहोचू शकला नाही, त्यामुळे त्याला टाईम आऊट देण्यात आले. मोठी गोष्ट म्हणजे हा आंतरराष्ट्रीय सामना नव्हता. ही पाकिस्तानमधील देशांतर्गत स्पर्धा आहे.
सतत विकेट पडल्यानंतर सौद शकील पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता, पण तो निर्धारित तीन मिनिटांत क्रिजपर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तान टेलिव्हिजन संघाचा कर्णधार अमाद बट्टने तातडीने अपील केले आणि पंचांनी ते फेटाळले. रिपोर्टसनुसार शकील झोपला असल्याचे म्हटले आणि वेळेवर फलंदाजीसाठी जाऊ शकला नाही. यासह, तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये टाइम आउट होणारा ७वा फलंदाज आणि इतिहासातील पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे.
क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणं म्हणजे काय?
जेव्हा एखादा नवीन फलंदाज संघाची विकेट गेल्यानंतर तीन मिनिटांत क्रीजवर पोहोचू शकत नाही, तेव्हा त्याला क्रिकेटमध्ये ‘टाइम आऊट’ असे म्हणतात. जर येणारा फलंदाज मर्यादित वेळेत क्रीजवर किंवा त्याच्या जोडीदाराची जागा घेण्यास तयार नसेल तर क्षेत्ररक्षण करणारा संघ ‘टाईम आऊट’साठी अपील करू शकतो. अपील यशस्वी झाल्यास फलंदाज बाद घोषित केला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद होण्याच्या दहा कायदेशीर पर्यांयांपैकी हा एक मार्ग आहे.