Pakistan beat Australia 2nd ODI Cricket Score: हारिस रौफचा वेग आणि पाकिस्तानच्या सलामी जोडीच्या विस्फोटक फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले अन् घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तान संघाने मोठा अपसेट करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केलं आहे. पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाचा वनडे सामन्यात तब्बल ९ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. यासह पाकिस्तानने ७ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे सामन्यात विजय नोंदवला आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन संघ अवघ्या ३५ षटकांत सर्वबाद झाला. ३५ षटकांत आस्ट्रेलियाचा संघ केवळ १६३ धावा करी शकला. म्हणजेच पाकिस्तानसमोर विजयासाठी फक्त १६४ धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तान संघाने या सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीसह सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा संघाचा निर्णय अगदी योग्य ठरला.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी तर कहरच केला. हारिस रौफने ८ षटकांत २९ धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, जो सामन्याचा सामनावीरही ठरला. तर शाहीन शाह आफ्रीदीने ८ षटकांत २६ धावा देत ३ विकेट्स घेतले. नसीम शाह आणि हसनैनने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
१६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. सलामीवीर सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक यांच्यात पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी झाली. या दोघांनीच संघाच्या विजयाच्या पाया रचला. सॅम अयुबने बाद होण्यापूर्वी ७१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची शानदार खेळी केली. तर अब्दुल्ला शफीकने ६९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६४ धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. नंतर आलेल्या माजी कर्णधार बाबर आझमने २० चेंडूत १५ धावा केल्या आणि विजयी षटकारासह संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
ग
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेलं कमी धावसंख्येचं लक्ष्य पाकिस्तानने १४१ चेंडू शिल्लक असताना केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. म्हणजे पाकिस्तान पूर्ण ९ विकेट्सनी जिंकला आहे. यापूर्वी १९८१ साली पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर ६ विकेटने पराभूत केले होते, हा सामना सिडनी येथे खेळला गेला होता. विकेट्सच्या बाबतीत हा पाकिस्तान संघाचा सर्वात मोठा विजय ठरला. २०२२ साली पाकिस्तानने लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाला ७३ चेंडू शिल्लक असताना पराभूत केले होते. तर आता पाकिस्तानने १४१ चेंडू शिल्लक ठेवत ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे, म्हणजेच आता दोन्ही बाबतीत पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.