Pakistan Beat England by 152 Runs in PAK vs ENG 2nd Test: पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत संघ बदलला आणि विजयाचा दुष्काळही संपवला. पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर तब्बल १५२ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. पाकिस्तानचे दोन गोलंदाज नोमान अली आणि साजिद खान यांनी इंग्लंडच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. पाकिस्तानच्या विजयात या दोघांनी मोठी भूमिका बजावत दोन्ही डावांमध्ये २० विकेट घेतले.
मुलतान येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने अवघ्या ४ दिवसांत इंग्लंडचा पराभव केला. पाकिस्तानच्या विजयाचा नायक त्यांचा फिरकी गोलंदाज ठरले. ज्यांनी सर्व २० विकेट घेतल्या. या शानदार विजयासह पाकिस्तानची १३३८ दिवसांची विजयाची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपुष्टात आली. पाकिस्तानने ११ पराभवांनंतर अखेरीस विजय मिळवला आहे.
मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी मुलतानच्या खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर शरणागती पत्करली. एकट्या नोमान अलीने इंग्लंडच्या ८ फलंदाजांना तंबूत धाडले. त्यामुळे संपू्र्ण इंग्लंडचा संघ १५० धावाही करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ १४४ धावाच करू शकला आणि परिणामी सामना गमावला.
हेही वाचा – Shakib Al Hasan: “माहीत नाही कुठे जाईन पण…”, शकीबला मायदेशी परतणं झालं कठीण, कसोटी कारकीर्दीची अखेर?
मुलतान कसोटीत पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. बाबर आझमच्या जागी आलेल्या कामरान गुलामच्या शतकाच्या जोरावर त्यांनी पहिल्या डावात ३६६ धावा केल्या आणि संघात दणक्यात पदार्पण केले. कामरान गुलामने ११८ धावांची खेळी केली. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २९१ धावा केल्या. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात सलमान आगाने ६३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पाकिस्तानचा दुसरा डाव २२१ धावांवर आटोपला. अशाप्रकारे इंग्लंडला २९७ धावांचे लक्ष्य मिळाले.
नोमान आणि साजिद खानच्या फिरकीची कमाल
इंग्लंडला २९७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानच्या फिरकीपटूंचा सामना करावा लागणार होता. पाकिस्तानी फिरकीपटूंच्या जाण्यात एकामागून एक पाकिस्तानी फलंदाज अडकले. नोमान अली आणि साजिद खान यांनी मिळून दोन्ही डावात इंग्लिश फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. पहिल्या डावात साजिद खानने ७ आणि नोमान अलीने ३ विकेट घेतले, तर दुसऱ्या डावात नोमान अलीने ८ तर साजिदने २ विकेट घेतले. म्हणजेच २० पैकी नोमान अलीने ११ तर साजिद खानने ९ विकेट घेतल्या. अशारितीने नोमान अलीने या सामन्यात १० विकेट्स हॉल घेत ऐतिहासिक कामगिरी केली. पाकिस्तानने या पराभवासह इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd