क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात भारताने हातातोंडाशी आलेली विजयाची संधी गमावली. त्याचेच काहीसे अनुकरण करत भारताने चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची संधी गमावली. पाकिस्तानने त्यांना रोमहर्षक लढतीत ४-३ असे हरवित अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पाकिस्तानला जर्मनीशी तोंड द्यावे लागेल. तिसऱ्या क्रमांकासाठी भारताला ऑस्ट्रेलियाशी लढत द्यावी लागेल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने ऑस्ट्रेलियाला ३-२ असे हरवले.
साखळी गटात पहिले तीनही सामने गमावल्यानंतर ईष्र्येने खेळ करत पाकिस्तानने येथील उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्ससारख्या बलाढय़ संघाला पराभवाचा धक्का दिला होता. भारतासाठी जणू काही त्यांनी इशाराच दिला होता. अटीतटीने झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले होते. पाकिस्तानकडून कादिर खान (१६ वे मिनिट), वकास खान (३२ वे मिनिट), इरफान खान (४८ वे मिनिट) व रसूल शेख (५८ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताकडून गुरजिंदर सिंग (११ वे मिनिट), धरमवीर सिंग (४२ वे मिनिट) व निक्कीन थिमय्या (५१ वे मिनिट) यांनी गोल केले. विजय मिळवल्यानंतर आनंद साजरा करताना चाहते आणि भारतीय प्रसारमाध्यमांच्या दिशेने विचित्र हावभाव केले. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या इतिहासात भारताला सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी होती, मात्र दडपणाखाली भारतीय संघाचा खेळ उंचावलाच नाही.
भारताने नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम लढतीत पाकिस्तानला हरवित ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. या पराभवाची परतफेड पाकिस्तानने येथे केली. त्यांना आता विजेतेपदासाठी जर्मनीच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी जोरदार आक्रमण केले. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत गुरजिंदर याने गोल केला. मात्र आघाडीचा हा आनंद त्यांना टिकविता आला नाही. १६ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या शकीलखान याने दिलेल्या पासवर कादिर याने सुरेख गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात भारतास पेनल्टी कॉर्नरची आणखी एक संधी मिळाली मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.
उत्तरार्धाच्या प्रारंभीच पाकिस्तानने वेगवान चाल केली. त्यांच्या वकास याने जोरदार फटका मारून भारताचा गोलरक्षक श्रीजेश याला चकवित गोल केला आणि संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताने त्यानंतर गोल करण्याच्या लागोपाठ दोन संधी वाया घालविल्या. अखेर ४२ व्या मिनिटाला गुरबाजसिंग याने दिलेल्या पासवर धरमवीर याने अप्रतिम गोल केला व २-२ अशी बरोबरी साधली. ही बरोबरी फार वेळ टिकली नाही. ४८ व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत इरफान याने कल्पकतेने गोल मारला. भारताने तत्परतेने त्याची परतफेड केली. गुरबाजच्या पासवर निक्कीन याने गोल केला व ३-३ अशी बरोबरी साधली. ५५ व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरची संधी दवडली. ५८ व्या मिनिटाला पाकिस्तानने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे विस्कळित झालेल्या भारताच्या बचावफळीला चकवित रसूल याने पाकिस्तानचा विजयी गोल केला. हा गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनेक चाली केल्या मात्र पाकिस्तानच्या बचावरक्षकांनी या चाली हाणून पाडल्या.  

Story img Loader