Pakistan Beat South Africa in ODI Series: पाकिस्तान संघाने मोठा धमाका करत दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या मैदानावरच त्यांचा लाजिरवाणा पराभव केला. पाकिस्तान अनेकदा नवख्या संघांसमोर टिकत नाही. पण आता त्याने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. पाकिस्तानी संघाने गुरुवारी रात्री उशिरा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान आफ्रिकेचा ८१ धावांनी पराभव केला. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. यासह पाकिस्तानने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन संघापेक्षा पाकिस्तानसाठी हा निर्णय योग्य ठरला. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि कामरान गुलाम यांच्या खेळीमुळे त्यांनी ५० षटकांत ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४३.१ षटकांत २४८ धावा करून सर्वबाद झाला.
हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५३ धावांतच दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. सैम अयुब २५ धावा करून बाद झाला तर अब्दुल्ला शफिकला खातेही उघडता आले नाही. मात्र यानंतर बाबर आझम (७४) आणि मोहम्मद रिझवान (८०) यांनी फक्त संघाचा डाव सावरला नाही तर उलट आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. कामरान गुलामने शेवटच्या षटकांमध्ये वेगवान फलंदाजी करत ३२ चेंडूत ६३ धावा केल्या.
३३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या ६ फलंदाजांनी चांगली सुरुवात केली पण क्लासेन वगळता कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. हेनरिक क्लासेनने ७४ चेंडूत ९७ धावा केल्या. संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा टोनी डी जॉर्जी होता, ज्याने ३४ धावांची खेळी केली.
डेव्हिड मिलर २९ धावा करून बाद झाला. उर्वरित फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला २५ धावांचा पल्ला गाठता आला नाही. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आफ्रिदीने ४ आणि नसीम शाहने ३ विकेट घेतल्या. अबरार अहमदने २ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला नमवले.