Champions Trophy Pakistan Unwanted Record: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा यजमान पाकिस्तानसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली. पाकिस्तानला गट टप्प्यातील एकही सामना जिंकता आलेला नाही. घरच्या मैदानावर स्पर्धा होत असूनही पाकिस्तान फेल ठरला. पाकिस्तानने स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने गमावले, ज्यामुळे स्पर्धेत बाहेर पडण्याची वेळ आली. तर तिसरा बांगलादेशविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यासह पाकिस्तानने आपल्या नावे नकोसा विक्रम केला आहे.

पाकिस्तान संघाचा तिसरा सामना रद्द होताच संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात याआधी कोणत्याही पूर्ण सदस्य संघासह असे घडले नव्हते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एकूण आठ सीझन खेळले गेले आहेत. पण यजमान राष्ट्राने स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही, असे यापूर्वी कधीचं घडले नव्हते. २००० मध्ये, जेव्हा केनियाने आयसीसी नॉकआउट स्पर्धेचे आयोजन केले होते, तेव्हा केनियाचा संघ एकच सामना खेळला पण तो सामनाही संघाने गमावत स्पर्धेतून बाहेर पडला. पण त्यावेळी या स्पर्धेतील सर्व सामने बाद फेरीसारखे खेळले जात होते, जो संघ पराभूत होत असे तो स्पर्धेतून बाहेर जात असे.

२००२ मध्ये या स्पर्धेचे नाव आयसीसी नॉकआऊट बदलून चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यात आले. तेव्हापासून २०१७ पर्यंत, यजमान राष्ट्राने स्पर्धेत एकही सामना जिंकला नाही असे कधीही घडले नाही. पण हा लाजिरवाणा विक्रम चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या नावावर झाला, या सीझनमध्ये पाकिस्तान संघ एकही सामना जिंकू शकला नाही.

पाकिस्तान या स्पर्धेत दोन सामने खेळला. त्यांचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध होता, जिथे त्यांचा ६० धावांनी पराभव झाला होता. तर भारताने यजमान संघाचा ६ गडी राखून पराभव केला. त्यांचा शेवटचा गट सामना बांगलादेशविरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा प्रवास विजयाशिवाय संपला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातून भारत आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे यजमानांना आणखी एक धक्का बसला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान या दोघांचे गुणतालिकेत प्रत्येकी ३ गुण आहेत. पण रन रेटमुळे यजमान संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला.