आगामी काही वर्षांमध्ये भारताविरुद्धच्या मालिका न झाल्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) जवळपास आठ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्सचे नुकसान होणार आहे. पीसीबीने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी येत्या ३-४ वर्षांसाठी प्रक्षेपणासाठी करार केला आहे. त्यामुळे ही मालिका न झाल्यास त्यांना हे नुकसान सोसावे लागणार आहे.

याबाबत पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संयुक्त अरब अमिराती येथे होणारी मालिका न झाल्यास त्यांना जवळपास सात कोटी अमेरिकन डॉलर्सचे नुकसान होणार आहे.
‘‘भारताविरुद्धच्या मालिकेच्या प्रक्षेपणासाठी आम्ही चार वर्षांचा करार केला आहे. या कराराची किंमत १४ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. जर भारताविरुद्धची एकही मालिका खेळवण्यात आली नाही तर आम्हाला या रकमेच्या ६५ टक्के रक्कम गमवावी लागणार आहे. त्यामुळे आम्हाला जवळपास आठ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्स एवढे नुकसान सोसावे लागणार आहे,’’ असे पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ‘‘जर भारताने ही मालिका खेळवण्यात समर्थता दर्शवली नाही तर आमचे मोठे नुकसान होणार आहे आणि याचे दूरगामी परिणाम होतील.’’पीसीबीने प्रक्षेपण कंपनीशी याबाबत एक करार केला आहे. यानुसार पीसीबीने भारताविरुद्ध एक किंवा दोन मालिकेचे यजमानपद भूषवणे गरजेचे आहे.

Story img Loader