BCCI on Champions Trophy 2025: पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे आयोजन करणार आहे, त्यासाठी आयसीसीने यजमानपदाचे त्यांना हक्क दिले आहेत. जरी पीसीबीने बीसीसीआयची अट मान्य केली तरी, असे वृत्त आहे की भारत पाकिस्तानमध्ये नव्हे तर युएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले सामने खेळू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) मुख्यालयात एका समारंभात या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्याचे अधिकार प्राप्त केले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ आणि आयसीसी जनरल कौन्सिल जोनाथन हॉल उपस्थित होते.
पीसीबीने यजमान पदाचे हक्क मिळवले असूनही, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला पाठविण्याबाबत बीसीसीआय अनुकूल दिसत नाही. बीसीसीआयने पाकिस्तानातील सुरक्षेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. याआधीही आशिया चषक २०२३ स्पर्धेत टीम इंडिया हायब्रीड मॉडेलमध्ये खेळली होती. त्यावेळीही या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. भारताने त्यांचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळले होते. या अंतर्गत, टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचल्यामुळे तो सामना देखील पाकिस्तानकडून काढून घेण्यात आला होता.
झका अश्रफ आणि संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत असे सूचित केले गेले आहे की, जर भारताने या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला तर युएईमध्ये टीम इंडियाचे सामने खेळवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जाऊ शकतो. यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही सामान्यांचे अधिकार हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात.
दुबईत झालेल्या त्यांच्या बैठकीत जरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ला विशिष्ट अजेंड्यात संबोधित केले गेले नसले, तरी युएईकडे पाकिस्तानच्या वारंवार सहकार्याने याची शक्यता निर्माण झाली आहे. हा क्रिकेट जगातील बीसीसीआयचा प्रभाव आणि शक्ती प्रतिबिंबित करते, जिथे त्यांच्या निर्णयांना खूप महत्त्व आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांच्या संभाव्य हस्तांतरणासह महत्त्वपूर्ण निर्णयांवर यामुळे खूप मोठा परिणाम होऊ शकतो.
पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशासाठी वचनबद्ध आहे, परंतु यावर जोर देण्यात आला आहे की जर एखाद्या संघाला पाकिस्तानमधील सुरक्षेबद्दल चिंता असेल तर आयसीसीने एकतर्फी निर्णय घेऊ नये. अलीकडील अहवालात असे सूचित केले गेले आहे की आयसीसीने ही विनंती स्वीकारली आहे आणि क्रिकेट इव्हेंट्सचे भविष्य घडविण्याच्या सहकार्याचे आणि मूल्यांकनाचे महत्त्व यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
यापूर्वी, आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेत असत, जे एकदिवसीय क्रमवारीत अव्वल -८ मध्ये होते. परंतु यावेळी आयसीसीने नियम बदलले आहेत आणि त्याचा निर्णय एकदिवसीय विश्वचषक २०२३ गुणांच्या गुणतालिकेवरून निश्चित केला. जे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये ८ संघ खेळतील. चार संघांचे दोन गट तयार केले जातील. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरी गाठतील आणि त्यानंतर त्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहचतील. फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये पाकिस्तानमध्ये अडीच आठवडे चालणारी १५ सामन्यांची ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.