पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज यूनुस वकार सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो ट्वीटच्या माध्यमातून क्रिकेट विश्वातील घडामोडींवर भाष्य करत असतो. सध्या त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीविषयी एक ट्वीट केले आहे. शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. परिणामी पाकिस्तानी संघात शाहीन आफ्रिदी नसणे म्हणजे भारतीय संघाच्या पहिल्या फळीतील फलंदाजांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल, असे यूनुस वकार ट्वीटच्या माध्यमातून म्हणाला आहे. त्याच्या याच ट्वीटमुळे तो ट्रोल होत आहे.
हेही वाचा >> IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी
येत्या २८ ऑगस्ट रोजी आशिय चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची दोन्ही देशातील नागरिक नेहमीच वाट पाहात असतात. मात्र या सामन्यापूर्वीच पाकिस्तानी संघाला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखातपीमुळे हा सामना खेळू शकणार नाही. हाच संदर्भ देत यूनुस वकारने एक ट्वीट केले आहे. “शाहीन आफ्रिदीला झालेली दुखापत एका प्रकारे भारतीय संघातील पहिल्या फळीच्या फलंदाजांसाठी दिलासाच ठरणार आहे. आफ्रिदीला आपण २०२२ च्या आशिया चषक स्पर्धेत खेळताना पाहू शकणार नाहीत. मित्रा लवकर बरा हो,” असे ट्वीट यूनुस वकारने केले आहे. त्याच्या या ट्वीटमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा >> क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदची विजयाची मालिका खंडित; पाचव्या फेरीत चीनच्या लिएमकडून पराभूत
मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान शाहीन आफ्रिदीने भारताच्या पहिल्या फळीतील विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल या दिग्गज फलंदाजांना तंबूत पाठवलं होतं. कोणत्याही संघाची कामगिरी ही पहिल्या फळीतील फलंदाजांवरच अवलंबून असते. हा इतिहास पाहता यूनुस वकारने शाहीन आफ्रिदीची दुखात म्हणजे पहिल्या फळीतील भारतीय खेळाडूंसाठी दिलासा आहे, असे मत मांडले आहे.
दरम्यान, गाले येथील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान त्याच्या उजजाय गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे शाहीन आफ्रिदीला डॉक्टरांनी चार ते सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परिणामी तो आशिया चषक स्पर्धा खेळू शकणार नाही.