क्रिकेटच्या इतिहासात जितकं वलय अॅशेस मालिकांना नसेल, विश्वचषकाच्या सामन्यांना नसेल, तेवढं वलय भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यांना असतं. मग तो टी-२० सामना असो, एकदिवसीय सामना असो वा कसोटी सामना. या दोन्ही संघांमधले दिग्गज खेळाडू तर दोन्ही देशांमधल्या क्रिकेट चाहत्यांसाठी देवासमानच! भारतात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरविषयी पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरात रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखला जाणारा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यानं एक आठवण सांगितली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधला क्रिकेटचा ज्वर, क्रिकेट चाहत्यांचं आपल्या आवडत्या खेळाडूंवरचं प्रेम आणि त्याचा खेळाडूंवर असणारा दबाव याची प्रचिती यावी!

२००७ मधली ती शेवटची मालिका!

एका मुलाखतीदरम्यान शोएब अख्तरनं ही आठवण शेअर केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावपूर्ण संबंध असल्यामुळे द्विपक्षीय मालिका बंद झाल्या आहेत. या दोन्ही देशांमध्ये २००७ साली शेवटची एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली गेली होती. पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. याच मालिकेदरम्यानची एक आठवण शोएब अख्तरनं स्पोर्ट्सकीडाशी बोलताना सांगितली आहे. “त्या क्षणी मला वाटलं की मी आता मेलो, मला कधीच भारताचा व्हिसा मिळणार नाही”, असं शोएब म्हणाला आहे.

टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री सोडणार प्रशिक्षकपद?; भारतीय संघात होणार बदल

नेमकं काय झालं होतं?

या आठवणीविषयी शोएब म्हणतो, “या मालिकेमध्ये एका अवॉर्ड शोदरम्यान मी तेंडुलकरची मस्करी करायचं ठरवलं. मला त्याला उचलायचं होतं. मी त्याला उचललं खरं, पण तो माझ्या हातातून सटकला. तेंडुलकर खाली पडला. त्याला एवढं काही लागलं वगैरे नाही, पण त्या क्षणी मला वाटलं की आता मी मेलो. मला भिती वाटली की जर सचिन तेंडुलकरला दुखापत झाली तर मला पुन्हा कधीच भारताचा व्हिसा मिळणार नाही. भारतीय लोक मला कधीच पुन्हा भारतात येऊ देणार नाहीत. किंवा ते मला जिवंत जाळून टाकतील!”

 

“पाकिस्ताननंतर भारताचं सर्वाधिक प्रेम”

पाकिस्ताननंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम भारताकडून मिळाल्याचं देखील शोएब अख्तरनं यावेळी सांगितलं. “पाकिस्ताननंतर जर कुठल्या देशामध्ये मला सर्वाधिक प्रेम मिळालं असेल तर तो देश भारत आहे. भारताच्या दौऱ्यामधल्या अनेक चांगल्या आठवणींचा संचय माझ्याकडे आहे. २००७च्या अवॉर्ड फंक्शननंतर झालेल्या गेट टुगेदरमधली ही आठवण देखील त्यातलीच एक आहे”, असं शोएब म्हणाला.