२०१९ विश्वचषकात भारत ५ जूनला आपला पहिला सामना खेळणार आहे. मात्र सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची…भारताचा फलंदाज सुरेश रैनानेही १६ तारखेला होणाऱ्या सामन्याआधी, पाकिस्तानला डिवचलं आहे. विश्वचषकात पाकिस्तान भारताला हरवूच शकत नाही असं वक्तव्य सुरेश रैनाने केलं आहे.

“माझ्या मते संघातला कोणताही खेळाडू आता पाकिस्तानविरुद्ध सामन्याचा विचार करत नसणार आहे. कारण सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. जर हे सामने आपण जिंकलो, तर पाकिस्तानविरुद्ध सामन्यात आपल्यावर कोणताही दबाव नसेल. पण आपण सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हरलो तर पाकिस्तानविरुद्ध सामन्यात आपल्या संघावर दबाव असेल. पण भारत सुरुवातीचे ३ सामने जिंकला, तर पाकिस्तान आपल्याला विश्वचषकात हरवूच शकत नाही.” रैना एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.

विश्वचषकासाठी भारताने समतोल संघाची घोषणा केली आहे. स्पर्धा सुरु होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो आणि सुरेश रैनाचा अंदाज खरा ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader