सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील पाकिस्तानी संघाची धुरा बाबर आझमच्या हाती देण्यात आलेली आहे. बाबर आझमदेखील कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. बाबर सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काल झालेल्या (८ जून) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी कर्णधाराने शतक झळकावून पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

बाबरने १०७ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. त्याचे हे सलग तिसरे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक आहे. तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनदा सलग तीन शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs SA 1st T20 : आजपासून रंगणार टी ट्वेंटीचा थरार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य संघ

बाबर आझमची तुलना नेहमीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. पण, विराट सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. याउलट बाबर सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. काल झालेल्या सामन्यात सलग तिसरे एकदिवसीय शतक ठोकून त्याने विराट कोहलीच्या नावे असलेला एक विक्रम आपल्या नावे केला. कर्णधार म्हणून विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. २०१७मध्ये विराटने १७ एकदिवसीय डावात एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र, बाबर आझमने कर्णधार म्हणून केवळ १३ डावांत हजार धावांचा करून विराटचा विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीच्या सध्याच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने नोव्हेंबर २०१९मध्ये शेवटचे शतक ठोकले होते. म्हणजेच गेल्या ३१ महिन्यांपासून त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एकही शतक करू शकलेला नाही. याच काळात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ११ शतके झळकावली आहेत. त्यामध्ये चार कसोटी, सहा एकदिवसीय आणि एका टी ट्वेंटी शतकाचा समावेश आहे.

Story img Loader