पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. मेलबर्नच्या क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. त्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या एका प्रश्नाने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.
टीम पाकिस्तानच्या अंतिम सामन्याच्या तयारीविषयी पत्रकार प्रश्न विचारणार असं अपेक्षित असताना अचानक आयपीएलचा मुद्दा निघाल्यानं बाबर अस्वस्थ झाला. त्यावेळी पाकिस्तानच्या मीडिया मॅनेजरने हस्तक्षेप करत वेळ मारुन नेली. “भविष्यात खेळाला फायदा व्हावा, यासाठी पाकिस्तानी क्रिकेटर आयपीएलमध्ये खेळतील का?” असा प्रश्न पत्रकार परिषदेत बाबर आझमला विचारण्यात आला. या प्रश्नाने चकीत झालेल्या बाबरने शेजारी उभ्या असलेल्या मीडिया मॅनेजरकडे पाहिले. त्यावेळी “आपण केवळ विश्वचषकाची संबंधित प्रश्न घेत आहोत”, असे मॅनेजरने सांगितले.
World cup final: सामन्याच्या दिवशी पाकिस्तानी संघ राहणार उपाशी; कारण जाणून वाटेल आश्चर्य
२००९ पासून पाकिस्तान संघांने आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे त्यांना आयपीएलच्या सहभागापासून रोखले जाण्यापूर्वी ते केवळ स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात खेळले होते.
दरम्यान, विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे दडपण जाणवत असल्याचे बाबरने पत्रकार परिषदेत सांगितले. “गेल्या तीन सामन्यांमध्ये आमच्या संघाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे चिंताग्रस्त होण्यापेक्षा मी जास्त उत्साही आहे. दडपण तर आहेच यात शंका नाही. पण या दडपणावर आत्मविश्वासाने मात करू”, असे बाबरने म्हटले आहे.