पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या पाच फलंदाजांमध्ये समावेश असणारा तो एकमेव फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय आणि टी २० फलंदाजी क्रमवारीमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. एकूणच एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो अतिशय चांगली कामगिरी करत आहे. मात्र, त्याच्या या कामगिरीमागे एका ज्येष्ठ व्यक्तीचा हात आहे. त्या व्यक्तीची मैदानातील उपस्थिती बाबरवरती अप्रत्यक्ष दबाब आणते. ही व्यक्ती म्हणजे बाबरचे वडील आझम सिद्दीकी आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने बाबर आझमची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये बाबर आपल्या आणि वडिलांच्या नात्याबद्दल बोलला होता. “मी क्रिकेट खेळतो याचे एकमेव कारण माझे वडील आहेत,” असे बाबरचे म्हणणे आहे. बाबरचे वडील क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही त्यांनी मुलाला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. आजही त्याचे वडील त्याचा जवळपास प्रत्येक सामना प्रत्यक्ष उपस्थित राहून बघतात.
“ते माझा प्रत्येक सामना बघतात. माझ्या फलंदाजीच्यावेळी तर निश्चितपणे मैदानात उपस्थित असतात. त्यामुळे माझ्यावरती एक प्रकारे दबाव तयार होतो. लवकर बाद नाही व्हायचे, चुकीचा फटका नाही मारायचा, वडील बघत आहेत, या गोष्टी सतत माझ्या मनात असतात,” असे बाबर म्हणाला.
“मी वाईट फटका मारला तर ते मला रागावतील अशी भीती आजही माझ्या मनात आहे. मात्र, ही गोष्ट माझ्यासाठी फार सकारात्मक ठरते. अब्बांच्या भीतीपोटी माझ्याकडून चूका होत नाहीत,” असे बाबर आझमचे म्हणणे आहे.