Pakistan tops ICC ODI Rankings: पाकिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा ५९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. या मालिकेत पाकिस्तानसाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. तिसरा एकदिवसीय सामना जिंकताच पाकिस्तानच्या संघाने आयसीसी क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत पाकिस्तान संघाने पहिले स्थान काबीज केले आहे.
पाकिस्तान वनडेत ठरला नंबर-१ संघ –
तीन एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर पाकिस्तान आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर-१ संघ बनला आहे. पाकिस्तानचे सध्या ११८.४८ रेटिंग गुण आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे ११८ रेटिंग गुण आहेत. दशांश संख्येत पाकिस्तान संघ पुढे आहे. पाकिस्तानचे २७२५ आणि ऑस्ट्रेलियाचे २७१४ गुण आहेत. याच कारणामुळे पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. भारताचे ११३ रेटिंग पॉइंट आहेत. वनडे क्रमवारीत टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. आशिया चषक स्पर्धेनंतर क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.
बाबरच्या नेतृत्वाखाली केली अप्रतिम कामगिरी –
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. या संघाने गेल्या वर्षी वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्सचा ३-० असा पराभव केला होता. यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध २-१ असा विजय मिळवला. आता अफगाणिस्तानविरुद्ध ३-० ने जिंकलेल्या मालिकेने पाकिस्तानला क्रमवारीत पहिल्या स्थानावर कब्जा केला.
या खेळाडूंनी केली दमदार कामगिरी –
उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पहिला वनडे १४२ धावांनी जिंकला. यानंतर दुसऱ्या वनडेच्या रोमहर्षक सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेत पाकिस्तानकडे २-० अशी अजिंक्य आघाडी होती, पण नंबर वन होण्यासाठी पाकिस्तानला तिसरी वनडे कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. तिसर्या वनडेत पाकिस्तानने अफगाणिस्तानला २६९ धावांचे लक्ष्य दिले होते.
हेही वाचा – CPL 2023: सुनील नरेनने रचला इतिहास, रेड कार्ड मिळवणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू
प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २०९ धावांत सर्वबाद झाला होता. बाबर आझम (६० धावा) आणि मोहम्मद रिझवान (६७ धावा) यांनी पाकिस्तानकडून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी केली. या खेळाडूंमुळेच संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. अफगाणिस्तानसाठी मुजीब उर रहमानने ६४ धावा केल्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक ३ बळी घेतले.