Champions Trophy 2025 Aqib Javed on Jasprit Bumrah : २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वी भारताने आपला मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची काळजी घ्यावी, असे पाकिस्तानचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांनी म्हटले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला सिडनी कसोटीच्या चौथ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आहे, जेथे त्याचे स्कॅनिंग केल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता येईल.
‘केवळ बुमराहला डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना बनवणार नाही’ –
बुधवारी लाहोरमधील गनी ग्लास मैदानावर पाकिस्तानच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान आकिब म्हणाला, ‘भारताने बुमराहच्या फिटनेसबद्दल काळजी करायला हवी. तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळता तेव्हा सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. अव्वल आठ सर्वोत्तम संघ खेळत आहेत. कोणत्याही संघात बुमराहसारखा गोलंदाज असेल तर तो एक प्लस पॉइंट आहे, पण आम्ही फक्त त्याचाच विचार करून सर्व योजना बनवू असे नाही.
आकिबने पाकिस्तान संघाचा केला बचाव –
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या संघ निवडीबाबत बरीच टीका झाली होती. अहमद शहजादपासून वसीम अक्रमपर्यंत सर्वांनीच या निवडीवर टीका केली होती. फहीम अश्रफ आणि खुशदिल शाह यांच्या संघातील निवडीवर टीकाकारांनी निशाणा साधला होता. या निवडीबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. चाहत्यांचा असा विश्वास आहे की त्याने अलीकडे काही विशेष कामगिरी केली नाही. मात्र, आकिबने त्याचा बचाव केला आहे.
आकिबचे फहीम आणि खुशदिल यांच्याबाबतचे वक्तव्य –
तो म्हणाला, “दोन सामन्यांच्या कामगिरीच्या आधारे बदल करणे योग्य नाही. हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतो. न्यूझीलंड, भारत आणि बांगलादेशविरुद्धचे तीन पूल सामने पाहता, तुम्हाला दोन अष्टपैलू खेळाडूंसह चार गोलंदाजी पर्यायांसह अव्वल सात फलंदाजांची गरज आहे.” आकिब, जो संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणूनही काम करत आहे, म्हणाला, ‘फहीम आणि खुशदिल हे दोघेही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा उपखंडातील परिस्थितीत खेळण्यासाठी चांगले पर्याय आहेत.’
‘पाकिस्तानचे ३२५ हून अधिक धावांचे लक्ष्य’
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाजीच्या जोरावर सुमारे ३२५ धावा करण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. तो म्हणाला, ‘अलिकडच्या वर्षांत २०० धावा हा टी-२० क्रिकेटमध्ये बेंचमार्क बनला आहे. त्यामुळे वनडेमध्ये ३२५ किंवा ३५० चा स्कोअर देखील शक्य आहे. विशेषत: जेव्हा क्षेत्ररक्षणात काही कठोर नियम असतात. सुरुवातीच्या षटकांमध्ये वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी देऊन तुम्ही चांगल्या धावा करू शकता.’
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तान संघ : फखर जमान, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, मोहम्मद रिझवान (कर्णधार), खुशदिल शाह, सलमान आगा, उस्मान खान, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, हरिस रौफ, नसीम शाह.