पीटीआय, कराची/दुबई

पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मागे घेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ही स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यासह (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्याची तयारी दर्शवली अहे. मात्र, त्यासाठी २०३१ पर्यंत भारतात होणाऱ्या स्पर्धाही अशाच संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार खेळविण्यात आल्या पाहिजेत आणि पाकिस्तानचे सामने अन्यत्र झाले पाहिजेत, अशी नवी अट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) ‘पीसीबी’ने ठेवली आहे.

चॅम्पियन्स करंडक आयोजनाच्या मुद्द्यावरून ‘आयसीसी’ची शनिवारी बैठक झाली. या बैठकीनंतर ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी संमिश्र प्रारुपास आपली संमती असल्याचे संकेत दिले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीतून ठोस तोडगा न निघाल्यामुळे हे बैठकीची सत्रे अशीच सुरू राहणार असल्याचे समजते आहे.

हेही वाचा >>>IND vs PAK : पाकिस्तानने युवा टीम इंडियाला केलं चीतपट, शाहजेब खानने साकारली शतकी खेळी

शनिवारच्या बैठकीनंतर नक्वी म्हणाले, ‘‘या संदर्भात मला अधिक भाष्य करायचे नाही, कारण त्यामुळे गोष्टी बिघडू शकतात. आम्ही आमचा दृष्टीकोन समोर ठेवला आहे. भारतीयांनीही त्यांचे मत मांडले आहे. क्रिकेट जिंकले पाहिजे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. नियम सर्वांना समान असले पाहिजेत.’’

तसेच भविष्यात ‘आयसीसी’च्या सर्व स्पर्धा याच स्वरुपात खेळविल्या गेल्या पाहिजेत. पाकिस्तानचे सामने भारतात होणार नाहीत, अशी नक्वी यांची मागणी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी यावर स्पष्ट भाष्य करणे टाळले.

‘पीसीबी’ने संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार खेळण्यासाठी वार्षिक महसूलात मोठ्या वाट्याची अटही घातल्याचे ‘पीसीबी’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. ‘पीसीबी’ने अतिरिक्त आयोजन शुल्काची मागणी केलेली नाही. मात्र, त्यांना वार्षिक निधीत वाढ हवी आहे. सध्या ‘आयसीसी’च्या वार्षिक महसूलातील ५.७५ टक्के इतका वाटा पाकिस्तानला मिळतो.

हेही वाचा >>>IND vs PAK: भारताविरूद्ध खेळतोय पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मुलगा, अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत केली शानदार कामगिरी; नेमका आहे तरी कोण?

चॅम्पियन्स स्पर्धेचीच अडचण?

‘आयसीसी’च्या वेळापत्रकानुसार, २०३१ सालापर्यंत भारतात पुरुषांच्या तीन प्रमुख स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यात २०२६ मध्ये श्रीलंकेसह ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे संयुक्त आयोजन, २०२९ चॅम्पियन्स करंडक आणि २०३१ मध्ये बांगलादेशसह एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धांचा समावेश आहे. त्याच वेळी पुढील वर्षी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही भारतात होणार आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, या सगळ्यात केवळ २०२९ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अडथळा येऊ शकतो. अन्य दोन स्पर्धांचे बांगलादेश आणि श्रीलंकेकडे सह-यजमानपद आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सामने या दोन देशांत होऊ शकतील.