पाकिस्तान क्रिकेट संघ शनिवारी दिल्लीमार्गे एका खासगी विमानाने बंगळुरू येथे दाखल होणार असल्याचे कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पाच वर्षांनी पाकिस्तानचा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचा संघ लाहोर येथून शनिवारी दुपारी ३ ते ३.१५ दरम्यान दिल्ली येथे पोहोचेल. त्यानंतर नवी दिल्ली येथे त्यांचा दोन तासांचा मुक्काम राहील आणि तेथून एका खासगी विमानाने ते बंगळुरूत येतील. रात्री ९ ते ९.१५ दरम्यान त्यांचे येथील विमानतळावर आगमन होईल.
भारत व पाकिस्तान यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना  चिन्नास्वामी स्टेडियमवर २५ डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. त्यांचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना २८ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना ३० डिसेंबर रोजी चेन्नई येथे होईल. दुसरा एकदिवसीय सामना कोलकाता येथे ३ जानेवारी रोजी, तर तिसरा एकदिवसीय सामना ६ जानेवारी रोजी होणार आहे. २००७ मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता, त्यानंतर प्रथमच या दोन संघांमध्ये दौरा होत आहे. २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन संघांमध्ये क्रिकेट मालिका आयोजित केलेली नाही.

Story img Loader