टी-२० वर्ल्डकप २०२४ येत्या जूनमध्ये अमेरिका-वेस्ट इंडिज इथे खेळवला जाणार आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २८ एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन आपल्या संघाच्या मर्यादित षटकांच्या आणि कसोटीसाठी दोन विदेशी मुख्य प्रशिक्षकांची नावे जाहीर केली.
पीसीबीने दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कसोटी फॉरमॅटसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूद दोन्ही फॉरमॅटमध्ये सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा दिग्गज पाकिस्तानचा कोच
२०११ मध्ये, जेव्हा भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा गॅरी कर्स्टन भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. कर्स्टन सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाच्या कोचिंग स्टाफचा एक भाग आहेत आणि आयपीएल संपल्यानंतरच पाकिस्तानी संघात सामील होणार आहेत.
कर्स्टन १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासह आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहेत. पीसीबीने कर्स्टन यांना २ वर्षांसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिका संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे.
पीसीबीने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीची कसोटी फॉरमॅटसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गिलेस्पीने आतापर्यंत बिग बॅश लीग, द हंड्रेड आणि काउंटीमधील संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. गिलेस्पी यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून सुरू होईल. यानंतर पाकिस्तानी संघाला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही कसोटी मालिका खेळायची आहे.