Pakistan Cricket Team Appointed New Coach After Gary Kirsten Resigned: पाकिस्तान क्रिकेट संघ, पीसीबी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने नुकतेच पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये नवा कर्णधाराची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद रिझवानला कर्णधारपद देण्यात आले. एका दिवसानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे असून चॅम्पियन्स ट्रॉफीला ४ महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, कर्स्टन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संघाची प्रशिक्षक म्हणून जबाबदारी कोण स्वीकारणार असा प्रश्न होताय यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी (२८ ऑक्टोबर) माहिती दिली की, व्हाईट बॉल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कर्स्टन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
पाकिस्तानला येत्या काळात ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका खेळायची आहे. यादरम्यान संघाचे प्रशिक्षक कोण असणार हे पीसीबीने जाहीर केले आहे. पाकिस्तानचे कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
गॅरी कर्स्टन यांना 2 वर्षांच्या करारादाखल संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण आता पीसीबी आणि जेसन गिलेस्पी यांच्याशी मतभेदांनंतर कर्स्टन यांनी राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ २०११ मध्ये विश्वविजेता बनला होता. एप्रिल २०२४ मध्ये त्यांची पाकिस्तान क्रिकेट संघाने २ वर्षांसाठी व्हाईट बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
कर्स्टन यांच्या पाकिस्तान संघाच्या कोचिंग कार्यकाळाची सुरुवात फारच खराब झाली. अमेरिका आणि भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान सुरूवातीलाच टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. काही महिन्यांनंतर, बाबर आझम दुसऱ्यांदा पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर आता कर्स्टन यांनीही संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.