गेल्या काही महिन्यांपासून स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात अडकत चाललेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या नावात आता खालिद लतिफ या खेळाडूची भर पडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक लवादाने खालिदला फिक्सिंग केल्याप्रकरणी दोषी ठरवत ५ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. याचसोबत खलिदला दंड म्हणून १ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या, पाकिस्तान सुपर लीग या टी-२० स्पर्धेत काही खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावरुन पाक क्रिकेट बोर्डाने संशयित खेळाडूंची चौकशी करायला सुरुवात केली होती. याआधी पाकिस्तानच्या शर्जिल खान या खेळाडूवरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. खालिदने सामन्यात खराब खेळ करण्यासाठी बुकींकडून लाच स्वीकारल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. खालिदने आतापर्यंत ५ वन-डे आणि १३ टी-२० सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या फिक्सिगबद्दलची माहिती दिली होती. यावर कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संशयित खेळाडूंच्या चौकशीला सुरुवात केली होती. या चौकशीतून दोषी आढळलेल्या खेळाडूंवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कारवाई करत आहे. याव्यतिरिक्त अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाझ आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद इरफान या खेळाडूंचीही चौकशी होणार असल्याचं समजत आहे.

Story img Loader