पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाहवर लैंगिक छळाच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. याबाबत इस्लामाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात यासिरचेही नाव आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी या प्रकरणाबाबत आपले मत दिले. देशातील कोणत्याही क्रिकेटपटूवर असे आरोप करणे खेळासाठी चांगले नाही, असे राजा यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी एका जोडप्याने इस्लामाबादमधील शालीमार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये यासिर शाहचेही नाव आहे. या जोडप्याने आरोप केला आहे, की क्रिकेटरने आपल्या १४ वर्षांच्या भाचीवर बलात्कार केल्याचे माहीत असतानाही त्याच्या मित्राला मदत केली आणि तिचा व्हिडिओ बनवला.
एवढेच नाही, तर त्याला आणि त्याच्या भाचीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तो आपल्या प्रसिद्धीचा वापर करून त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे धमकावत होता. यासिर आणि त्याचा मित्र यांच्याशी संपर्क होऊ शकला नसून या प्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाकिस्तानसाठी ४६ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या यासिरला बोटाच्या दुखापतीमुळे बांगलादेशला दौरा करता आला नाही.
हेही वाचा – याला काय अर्थ आहे..! टीम इंडियाला एकट्यानं गुंडाळणाऱ्या एजाज पटेलची न्यूझीलंड संघातून हकालपट्टी!
रमीझ राजा बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, “यासिर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि आम्ही या खेळाडूंना प्रशिक्षण आणि शिक्षण देतो, याबद्दल विचार करण्यासारखे काहीच नाही. त्यांची भूमिका खेळाच्या दुताची आहे आणि त्यांनी कोणाशी आणि केव्हा वागावे हे त्यांना समजले पाहिजे. मला माहीत नाही, की या प्रकरणाचे सत्य काय आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की अशा गोष्टी पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले नाहीत आणि विशेषत: अशा वेळी जेव्हा पाकिस्तान क्रिकेटमध्ये चांगला काळ परत येत आहे.”
एफआयआरमध्ये म्हटले आहे, की जेव्हा पती-पत्नी मदतीसाठी यासिरकडे गेले तेव्हा त्याने या संपूर्ण घटनेची खिल्ली उडवली आणि त्यांना हाकलवून लावले.
नक्की प्रकरण काय
पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यासिर शाहचा मित्र फरहानने एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या सर्व प्रकाराचा फरहानने व्हिडीओही बनवला. त्यानंतर त्याने या मुलीचे आणि यासिरचे बोलणे करुन दिले. एफआयआरमधील माहितीनुसार यासिरने या संवादादरम्यान मुलीला धमकी देत घडलेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता न करण्यास सांगितले. इतकेच नाही, तर यासिरने या पिडीत मुलीने त्याच्या मित्राशी लग्न करावे म्हणून तिच्यावर दबावही टाकला. या प्रकरणामध्ये आता वैद्यकीय चाचणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.