Pakistan Asia Cup Squad: येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (२ ऑगस्ट) जाहीर करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेच वेळापत्रक जाहीर करताच पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने (पीसीबी) आशिया चषकासाठी आपला संघ निवडला आहे.
पीसीबीने आशिया चषकासाठी १५सदस्सीय चमूची निवड केली आहे. विशेष म्हणजे निवडण्यात आलेल्या चमूमध्ये वेगवान गोलंदाज हसन अलीचा समावेश नाही. फलंदाजीची सर्व मदार कर्णधार बाबर आझमवर टिकून असेल. तर, गोलंदाजीमध्ये शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
यावेळच्या आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. मात्र, तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती बघता स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलवण्यात आली. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे टी २० फॉर्मेटमध्ये आशिया चषक खेळवला जाईल.
वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशन ‘अ’ गटात आहेत. दोन्ही देश २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप आपल्या चमूची निवड केलेली नाही. त्यामुळे भारतीय संघात कुणाची वर्णी लागते, याबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.
दोन्ही गटातील दोन अव्वल संघ ‘सुपर फोर’ फेरीसाठी पात्र ठरतील. ‘अ’ गटातील भारत आणि पाकिस्तान संघ सुपर फोरसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास दोन्ही संघ ४ सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. सुपर फोरमधील अव्वल दोन संघ ११ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप-कर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस राऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.