सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील पाकिस्तानी संघाची धुरा बाबर आझमच्या हाती देण्यात आलेली आहे. बाबर आझमदेखील कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. बाबर सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या नेतृत्वखाली पाकिस्तानच्या संघाने नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. मात्र, याच मालिकेच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार आझमने मैदानात असे कृत्य केले की, त्याचा भूर्दंड संपूर्ण संघाला भरावा लागला.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. त्यातील दुसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी मुलतानमध्ये झाला. हा सामना पाकिस्तानने १२० धावांनी जिंकला. पण, या सामन्यादरम्यान कर्णधार बाबर आझमने एक अशी चूक केली, ज्याची शिक्षा संपूर्ण संघाला भोगावी लागली.
हेही वाचा – निवृत्तीनंतर युवराजने सिंगने केले दुसरे लग्न! आई शबनम सिंग यांनी केला खुलासा
वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना मोहम्मद नवाजने २९वे षटक टाकले. त्यावेळी वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ स्ट्राईकवर होता. त्याने नवाजचा पहिला चेंडू डाव्या बाजूला टोलावला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. यानंतर क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्ट्यांच्या दिशेने फेकला. हा चेंडू क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या बाबरने अडवला पण हे करताना त्याने यष्टीरक्षण करण्याच्या हातमोज्यांचा वापर केला.
बाबरची ही कृती क्रिकेटच्या नियमानुसार योग्य नव्हती. क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरीलेबोन क्रिकेट क्लबने याबाबत स्पष्ट नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीतील नियम २८.१ नुसार, ‘यष्टीरक्षकाशिवाय कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हातमोजे किंवा बाह्य लेग गार्ड घालण्याची परवानगी नाही.’ २९व्या षटकादरम्याने बाबरने नेमके तेच केले. त्यामुळे पंचानी संपूर्ण पाकिस्तानच्या संघाला शिक्षा दिली. पंचांनी पाकिस्तानच्या संघाला दंड म्हणून वेस्ट इंडिजच्या संघाला अतिरिक्त पाच धावा दिल्या.