World Test Championship Points Table: पाकिस्तान क्रिकेट संघाला घरच्या मैदानावर अजून एक लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानी संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५५० हून अधिक धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतरही संघाला एका डावाने मोठा पराभव पत्करावा लागला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही मालिका खेळवली जात आहे.

मोठी गोष्ट म्हणजे हा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. या विजयाचा फायदा इंग्लंडला झाला आहे. इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. मात्र, याचा टीम इंडियाच्या स्थानावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानच्या संघाला सहाव्या कसोटी पराभवानंतर थेट तळाचे स्थान मिळाले आहे.

हेही वाचा – PAK vs ENG: पाकिस्तानचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून पाकिस्तानचा संघ जवळपास बाहेर

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मुलतान कसोटीपूर्वी, पाकिस्तान संघाची टक्केवारी १९.५० होती, जी आता १६.६७ झाली आहे. तर विंडीज संघाला न खेळताही एका स्थानाची झेप मिळाली आहे. वेस्ट इंडिजचा संघ आता १८.५२ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर आपण इंग्लंडबद्दल बोललो तर या सामन्यापूर्वी इंग्लंडची टक्केवारी ४२.१९० होते, जे आता वाढून ४५.५९ टक्के झाले आहे. मात्र, त्यानंतरही त्याला चौथ्या स्थानावरच राहावे लागणार आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. टीम इंडियाची टक्केवारी सध्या ७४.२४० आहे. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ६२.५०० असून हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा संघ ५५.५६० टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: कॅप्टन असावा तर असा… रोहित शर्माने अपघातग्रस्त मुशीर खानसाठी केलं असं काही की चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

WTC गुणतालिकेत पाकिस्तानला जबर धक्का

पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या होत्या, मात्र प्रत्युत्तरात इंग्लंडने जो रूटचे द्विशतक आणि हॅरी ब्रूकच्या त्रिशतकाच्या जोरावर ७ विकेट्सवर ८२३ धावा करून डाव घोषित केला. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला २२० धावांवर बाद केले आणि डाव आणि ४७ धावांनी सामना जिंकला. पाकिस्तानला या पराभवाचा फटका सहन करावा लागला आणि डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये ते तळाच्या स्थानावर आले, तर या विजयानंतर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान आठव्या क्रमांकावर होता तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर होता.