PCB Chairman Mohsin Naqvi Decision : पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी लष्करासोबत सराव करणार आहेत. हे शिबिर २५ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. इस्लामाबादमधील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान अनेक पाकिस्तानी खेळाडूंच्या उपस्थितीत पीसीबीचे विद्यमान अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ही घोषणा केली. पाकिस्तानी संघातील खेळाडूंचा फिटनेस झपाट्याने सुधारण्यासाठी नक्वी यांनी हे अजब प्लॅनिंग केले आहे, जेणेकरून खेळाडू मैदानावर सहज मोठे षटकार ठोकू शकतील. पीएसएल हंगाम संपल्यानंतर आठवडाभरानंतर हे प्रशिक्षण शिबिर सुरू होईल.
पाकिस्तानी खेळाडूंना स्टँडवर षटकार मारता येत नाही – नक्वी
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “मी लाहोरमध्ये सामना पाहत होतो, तेव्हा मला वाटत नाही की तुमच्यापैकी कोणीही षटकार मारला असेल, जो थेट स्टँडमध्ये गेला. असा षटकार मी जेव्हा केव्हा पाहिला तेव्हा तो परदेशी खेळाडूने मारला असावा.”
पाकिस्तानी लष्कर खेळाडूंना देणार प्रशिक्षण – नक्वी
नक्वी पुढे म्हणाले, “मी बोर्डावर उपस्थित लोकांना सांगितले आहे की, खेळाडूंचा फिटनेस झपाट्याने सुधारेल अशी योजना त्यांनी बनवावी. पीएसएल संपल्यानंतर आम्हाला न्यूझीलंड, आयर्लंड, इंग्लंड आणि त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप खेळायचा आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी विंडो शोधणे आमच्यासाठी सोपे नव्हते परंतु आम्हाला एक विंडो मिळाली. ज्यामध्ये सर्व खेळाडू काकुलमधील या शिबिरात सहभागी होतील ज्यामध्ये तुमच्या सोबत आर्मीचे लोक देखील उपस्थित असतील. ते तुम्हाला प्रशिक्षण देतील.”
हेही वाचा – WPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या शबनीम इस्माईलने रचला इतिहास, महिला क्रिकेटमधील टाकला सर्वात वेगवान चेंडू
पाकिस्तानसाठी खेळायला प्राधान्य द्यावे –
मोहसीन नक्वीने आपल्या वक्तव्यात सर्व खेळाडूंना असा संदेश दिला आहे की, “त्यांचे पाकिस्तानसाठी खेळणे हे त्यांचे पहिले आणि टी-२० लीग दुसरे प्राधान्य असले पाहिजे. तुमच्यासाठी पैसा ही पहिली प्राथमिकता असू नये. कारण तसे झाल्यास मंडळाला अडचणी येऊ शकतात. तुमची इच्छा असेल तर आम्ही केंद्रीय करारांचा विचार करू शकतो आणि ते वाढवण्याचा विचार करू शकतो, पण तुमच्यासाठी पाकिस्तान संघ प्रथम प्राधान्य असले पाहिजे.”