पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली याच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचं निधन झालं आहे. आसिफ अलीच्या मुलीला कॅन्सर झाला होता. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहोचला होता. अमेरिकेतील एका रुग्णालयात आसिफ अलीच्या दोन वर्षांच्या मुलीवर उपचार सुरु होते. सोमवारी चिमुरडीची कॅन्सरबोत झुंज अयपशी ठरली. पाकिस्तान सुपर लीगमधील आसिफ अलीचा संघ इस्लामाबाद युनायटेडने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली.

आसिफ अलीने गेल्या महिन्यात ट्विट करत आपल्या चाहत्यांना मुलीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे दोन वर्षांची मुलगी रुग्णालयात आयुष्याशी लढा देत असताना आसिफ आपल्या संघासाठी मैदानात खेळत होता. रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड संघांदरम्यान एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात होता. यावेळी आसिफ अली पाकिस्तान संघाचा भाग होता.

या सामन्यात आसिफ खास कामगिरी करु शकला नाही. १७ चेंडूवर २२ धावा करुन तो बाद झाला. इंग्लंडविरोधातील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानचा ५४ धावांनी पराभव झाला. मुलीचं निधन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आसिफ अली पाकिस्तानला परतणार आहे. आसिफ अलीला वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आलेलं नसलं तरी रिझर्व्ह कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकतं.

या मालिकेत पाकिस्तानचा संघ एकही सामना जिंकू शकला नाही. पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. तर उर्वरित चारही सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत पाकिस्तानला व्हाइटवॉश दिला.

Story img Loader