Champions Trophy Pakistan EX Cricketer Controversial Statement: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाने एकही सामना न गमावता आयसीसी स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करत १२ वर्षांनी या स्पर्धेच्या करंडकावर आपले नाव कोरले. यंदाच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण पाकिस्तानचा संघ गट टप्प्यात सुरूवातीचे दोन्ही सामने गमावत स्पर्धेतून बाहेर झाला. पण भारताने मात्र स्पर्धेत अपराजित राहत जेतेपदही नावे केले. भारताच्या या विजयाने पाकिस्तानच्या माजी खेळाडूला चांगल्याच मिरच्या लागल्या आहेत.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू तनवीर अहमदला टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं पचलेलं नाही, कदाचित त्यामुळेच तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसला. दुबईत भारताच्या बाजूने खेळपट्टी जाणूनबुजून तयार करण्यात आली होती असा आरोप तनवीर अहमदने केला आहे. भारताने आपली चॅम्पियन्स ट्रॉफी कचऱ्यात टाकली पाहिजे, असे तो म्हणाला.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तनवीर अहमदने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या विजयावर वादग्रस्त विधान केले आहे. त्याने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर दुबईत भारताच्या बाजूने खेळपट्टी तयार केल्याचा आरोप केला. तन्वीरने असे म्हटले आहे की, “भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनलमधील विजय कचऱ्यात टाकला पाहिजे कारण या विजयाची काहीच किंमत नाही.”
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावरही त्याने मोठं वक्तव्य केलं आणि म्हणाला, “हेच तर जय शाहला हवं होतं. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल जिंकावी हेच त्याला हवं होतं. संपूर्ण जग ओरडून सांगतंय की भारताचे सर्व सामने एकाच ठिकाणी खेळले जात आहेत, ज्याचा फायदा होतोय. मग आजची (फायनलच्या दिवशी) खेळपट्टी पाहा. तुम्ही ती खेळपट्टी अधिक सपाट आणि कोरडी का नाही केली? अजून स्लो करायची होती, जे जमेल ते करायचं होतं. बीसीसीआय आधीच नाटकी बोर्ड आहे आणि त्यांचा माणूस जय शाह आयसीसीचा चेयरमन झालाय. जो पूर्ण वेळ तिथेच बसून असतो. मग साधी गोष्ट आहे की त्याचा संघ जिंकणारच. जेव्हापासून हायब्रिडची चर्चा होती तेव्हाच सगळे बोलत होते भारत जिंकणार…”
तन्वीर अहमद यांनी दुबई आणि पाकिस्तानातील खेळपट्टीशी तुलना करत सांगितले, “पाकिस्तानमध्ये, फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी होती जिथे फिरकी गोलंदाजांना मदत नव्हती. जर भारत तिथे खेळला असता तर त्यांनी चांगली कामगिरी केली असती, परंतु त्यांचे फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा फायदा होता. असे विजय कचऱ्याच्या डब्यात टाकले पाहिजेत. हा खरा विजय नाही. ते पाकिस्तानात का आले नाहीत?”
न्यूझीलंडविरुद्ध भारताने शानदार कामगिरी करत सामना जिंकला. रोहित शर्माशिवाय संघातील इतर खेळाडूंनीही महत्त्वाची भूमिका बजावली. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला आणि यामुळे संघाला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावता आली.