पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. मॅच फिक्सिंगप्रकरणी तो दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली आहे. या काळात त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी क्रिकेटपटू उमर अकमलला मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. अकमलच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शिस्तपालन समिती तपास करत होती. त्याच अंतर्गत त्याची चौकशीदेखील केली गेली होती. या तपासाअंती त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धी विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून उमर अकमलवरील कारवाईची माहिती दिली.
Umar Akmal handed three-year ban from all cricket by Chairman of the Disciplinary Panel Mr Justice (retired) Fazal-e-Miran Chauhan.
— PCB Media (@TheRealPCBMedia) April 27, 2020
अकमलने एका मुलाखतीत असे सांगितले होते की त्याला सामना सुरू असताना दोन वेळा चेंडू जाणूनबुजून सोडण्यासाठी २ लाख अमेरिकन डॉलर्स देण्याचे लालूच दाखवले होते. भारताविरूद्धच्या सामन्यातच त्याला चेंडू सोडण्यास सांगितल्याचेही त्याने मुलाखतीत स्पष्ट केले. २०१५ ला ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्याशी फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. पण त्याने ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितली नव्हती, त्यामुळे त्याला दणका देण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमावलीनुसार, जर एखाद्या खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी कोणतीही ऑफर मिळाली किंवा संपर्क साधला गेला, तर त्याने याबाबत संघ व्यवस्थापन किंवा संघातील इतर अधिकारी वर्ग यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. जर एखाद्या खेळाडूने तसे न केल्यास आणि तो दोषी सिद्ध झाल्यास त्याच्यावर सहा महिन्याचे निलंबन ते आजन्म बंदीपर्यंतची तरतूद आहे.