टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे २४ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना खेळला जाईल. त्याआधी पाकिस्तानी क्रिकेट संघाला दोन धक्के बसले आहेत. वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ग्रँट ब्रॅडबर्न यांनी पाकिस्तानच्या उच्च कार्यक्षमता प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांचा एक खेळाडू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला आहे.
युवा फलंदाज झीशान मलिकबाबत पाकिस्तानमध्ये स्पॉट फिक्सिंगचे ताजे प्रकरण समोर आले आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला तात्काळ प्रभावाने निलंबितही केले आहे. तो टी-२० विश्वचषक संघाचा भाग नसला, तरी एकापाठोपाठ एक होत असलेल्या या घटनांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) डोकेदुखीमध्ये भर पडली आहे.
अलीकडेच पाकिस्तानमध्ये एक घरगुती टी-२० स्पर्धा पार पडली. युवा खेळाडू झीशान मलिकही या स्पर्धेत खेळत होता. या दरम्यान, स्पॉट फिक्सिंग संदर्भात काही लोकांनी त्याच्याशी संपर्क साधला, पण झीशानने पीसीबीला याबद्दल माहिती दिली नाही. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या खेळाडूवर कडक कारवाई केली आणि मीडिया रिपोर्टनुसार त्याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा – T20 WC: ‘‘पाकिस्तान का खेळतोय?, तुम्ही आम्हाला…”; हरभजननं शोएब अख्तरची काढली कळ!
२०१६ मध्ये पाकिस्तानसाठी १९ वर्षांखालील विश्वचषक खेळणाऱ्या झीशानच्या आधीही पाकिस्तानमध्ये फिक्सिंगचे ढग दाटले होते. अनेक स्टार खेळाडूंची कारकीर्दही यामुळे संपली. ज्यात सलमान बट आणि मोहम्मद आसिफ सारखी मोठी नावे समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त, मोहम्मद आमिरला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागला.