भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफने अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या आठ वर्षापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध असताना देखील भारताने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास टाळाटाळ केली, असा आरोप मोहम्मद युसूफने केला आहे.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेटच्या मैदानात उतरणे, अशक्य असल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्संनी नाराजी व्यक्त केली आहे. अनुराग ठाकूर यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटसंबंधावर केलेली ही टीपण्णी पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफला पटलेली नाही. अनुराग यांच्या या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने गांभिर्याने विचार करायला हवा, असेही मोहम्मद युसूफ यांनी म्हटले.
भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी राजकीय भूमिका न घेता क्रिकेट संघाचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडावी, असा सल्ला देखील युसूफने दिला. भारतीय क्रिकेट मंडळाची धुरा सांभाळणारे अनुराग ठाकूर हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.
माजी कर्णधाराच्या सुरात सुर मिसळत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल कादीर याने देखील अनुराग यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेटसंदर्भात पाकिस्तानने नेहमीच राजकीय विचारांना दूर ठेवल्याचे सांगत त्याने अनुराग ठाकूर क्रिकेटच्या मैदानावर राजकीय खेळी करीत असल्याचे म्हटले आहे. भारताच्या क्रिकेट संदर्भातील भूमिकेमुळे पाकिस्तानने इतर स्पर्धामध्ये देखील भारतीय संघासोबत खेळण्याबाबत विचार करावा, अशी भूमिका अब्दुल कादीर याने मांडली आहे.
#Pakistan sponsors terror, no #cricket possible: @BCCI Chief @ianuragthakur https://t.co/SC8sDOhWC2 pic.twitter.com/CZ55b5diIa
— Financial Express (@FinancialXpress) September 23, 2016