भारत-पाकिस्तान लढत म्हणजे फक्त भारत व पाकिस्तानच नव्हे, तर जगभरातल्या क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. याच पर्वणीसाठी सध्या विश्वचषकाच्या गुणतालिकेकडे अवघ्या जगातल्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. वर्ल्डकपमध्ये रोजच्या रोज होणाऱ्या सामन्यांमधून गुणतालिकेत वारंवार बदल होताना दिसत आहेत. आता वर्ल्डकप लीग फेरीचा हा शेवटचा टप्पा असून प्रत्येक संघाचे एक किंवा दोनच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे सेमी फायनलचं चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. मात्र, आता खरी चुरस आहे सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या चौथ्या स्थानासाठी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डकवर्थ लुईस पाकिस्तानला पावला!

शनिवारी न्यूझीलंडनं सेमीफानल गाठण्यासाठी कंबर कसूनच मैदानात प्रवेश केला होता. त्यामुळेच पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडनं पाकिस्तानच्या ‘वर्ल्ड क्लास’ गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढली आणि ४०१ धावांचा पाऊस पाडला. विजयासाठी तब्बल ४०२ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सुरुवातीलाच भरवशाच्या अब्दुल्ला शफीकच्या (४) रुपात मोठा धक्का बसला. पम त्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार बाबर आझमनं फखर झमानच्या साथीनं एकही विकेट पडणार नाही याची काळजी घेतली. तर झमाननं अवघ्या ६५ धावांत तडाखेबाज शतक झळकावत संघाचा रनरेट खाली जाणार नाही याची काळजी घेतली. या जोरावर पाकिस्ताननं फक्त एका गड्याच्या मोबदल्या २५ षटकांमध्ये २०० धावा केल्या. पावसामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार न्यूझीलंडचा पराभव झाला!

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ! कांगारुंचा इंग्लंडवर ३३ धावांनी रोमहर्षक विजय

आता येऊयात पॉइंटटेबल अर्थात गुणतालिकेकडे!

शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा ३३ धावांनी पराभव करत त्यांचं वर्ल्डकपमधलं उरलंसुरलं आव्हानही संपुष्टात आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ७ सामन्यांमधून १० गुण जमा झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे उरलेले सामने अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी आहेत. यातला एक सामना जरी ऑस्ट्रेलियानं जिंकला, तरी त्यांचं सेमीफायनलमधलं स्थान निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे भारत, दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर सेमीफायनलसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ऑस्ट्रेलिया असेल हे निश्चित मानलं जात आहे. जर दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाली, तर मात्र चित्र वेगळं दिसू शकेल.

वर्ल्डकप २०२३ पॉइंट टेबल!

चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस आहे! न्यूझीलंड व पाकिस्तानचा प्रत्येकी एक सामना शिल्लक असून दोघांच्या नावावर ८ गुण आहेत. तर अफगाणिस्तानचे दोन सामने शिल्लक असून त्यांच्या नावावरही ८ गुण आहेत. न्यूझीलंडचा उरलेला सामना यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फारशी चांगली कामगिरी न करू शकलेल्या श्रीलंकेशी आहे. तिथे न्यूझीलंड मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे पाकिस्तानचा सामना स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेल्या इंग्लंडविरुद्ध असेल. इथे पाकिस्तानचाही नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा जास्त ठेवण्यासाठी मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.

डार्क हॉर्स अफगाणिस्तान!

यात न्यूझीलंड पराभूत झाल्यास त्यांना अफगाणिस्तानच्या दोन पराभवांकडे डोळे लावून बसावं लागेल. पण पाकिस्तान पराभूत झालं तर मात्र त्यांचं आव्हान संपुष्टात आलं असेल. कारण न्यूझीलंडचा नेट रनरेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचे सामने अनुक्रमे बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघांशी आहेत. आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहोचली असली, तरी ऑस्ट्रेलिया मात्र आपलं स्थान पक्क करण्यासाठी या सामन्यात विजयाच्या निश्चयानंच उतरेल. त्यामुळे हे दोन्ही सामने अफगाणिस्तानला जिंकणं कठीण दिसतंय. पण यंदाच्या स्पर्धेत खऱ्या अर्थानं डार्क हॉर्स ठरलेल्या अफगाणिस्तानच्या टीमनं धक्कादायक निकाल नोंदवला, तर मात्र पॉइंट टेबल पुन्हा एकदा फिरू शकतो!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan defeat new zealand on duckworth lewis methid world cup point table pmw
Show comments