बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेतील तेरावा सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर १३ धावांनी मात केली. विशेष म्हणजे कालच थायलँडने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि आज पाकिस्तानने भारताचा पराभव करत भारताला मोठा धक्का दिला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव १२४ धावात संपुष्टात आला. मात्र त्यानंतरही भारत गटात पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय संघाने ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकून क्रमवारीतील आपला प्रथम क्रमांक अबाधित ठेवला आहे. खरं तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने देखील ४ पैकी तीन सामने जिंकले आहेत मात्र भारताची धावगती (नेट रनरेट) जास्त असल्यामुळे भारतीय संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या क्रमवारीत भारत पहिल्या तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर स्थित आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे यजमान बांगलादेश आणि श्रीलंकेचा संघ आहे.
हेही वाचा : Ind vs Pak Women’s T20 Asia Cup: पाकिस्तानने रोखला भारताचा विजयरथ, १३ धावांनी केला पराभव
दरम्यान, भारतीय संघाने आशिया चषकावर सहावेळा आपले नाव कोरले असून या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून भारत फेवरेट आहे. महिला ब्रिगेडने स्पर्धेतील आपले सलामीचे तिन्ही सामने जिंकून एकतर्फी वर्चस्व राखले होते, मात्र पाकिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे संघाचा विजयी रथ रोखला गेला. भारताला या स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला तर थायलंडच्या संघाने गुरूवारी पाकिस्तानच्या संघाचा पराभव करून इतिहास रचला. तर मलेशियाच्या संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मागील पाच सामन्यांमध्ये भारतच विजेता ठरला होता. तसेच २०१८च्या आशिया चषकातही भारतच जिंकला होता. त्याचबरोबर यावर्षीची भारत-पाकिस्तान महिला संघांची ही दुसरी भेट आहे. याआधी ते बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये समोरासमोर आले होते. तेव्हाही भारताचेच पारडे जड ठरले होते. तो सामना भारताने ८ गडी राखून जिंकला होता.
गुणतालिकेतील पहिले दोन संघ
१)भारत ४ ३ १ ६ +२.४८०
२)पाकिस्तान ४ ३ १ ६ +१.६८४