PAK vs ENG Pakistan Announced Playing XI: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. सततच्या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटने मोठा निर्णय घेत इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये बाबर आझमही सामील आहे, याशिवाय दोन स्टार गोलंदाजांनाही डच्चू देण्यात आला आहे.
पाकिस्तानने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. या प्लेईंग इलेव्हनमधून बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना वगळण्यात आलं आहे. हे खेळाडू बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममधून जात आहेत, मात्र बाबर आझमसारख्या मोठ्या स्टारला वगळणे हा पाकिस्तानी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. या तीन स्टार खेळाडूंशिवाय सरफराज खानलाही वगळण्यात आले आहे.
पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ५५६ धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. त्यांनी ७ गडी गमावून ८२३ धावा केल्या आणि त्यानंतर इंग्लंडने डाव घोषित केला. यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला आणि त्यांचा संघ अवघ्या २२० धावांवर ऑलआऊट झाला. यासह, सामन्याच्या पहिल्या डावात ५५० अधिक धावा केल्यानंतरही पराभवाचा सामना करणारा पाकिस्तान कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला.
बाबरच्या जागी कोणाला मिळाली संधी?
बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि सरफराज खान यांना संघातून का वगळण्यात आले याबाबत पीसीबीने कोणतीही माहिती दिलेली नाही. या चार खेळाडूंच्या जागी त्यांनी हसीबुल्लाह, मेहरान मुमताज, कामरान गुलाम, वेगवान गोलंदाज मोहम्मद अली आणि फिरकीपटू साजिद खान यांचा समावेश केला आहे. सुरुवातीला पहिल्या कसोटी संघाचा भाग असलेले पण नंतर रिलीज करण्यात आलेले नोमान अली आणि जाहिद महमूद यांचाही १६ खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ
शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.
© IE Online Media Services (P) Ltd